गेल्या अनेक दिवसांपासून सॅमसंग गॅलेक्सी जे७ ड्युओ या स्मार्टफोनच्या लाँचींगबाबत चर्चा सुरू होती. याचे अनेक लीक्सदेखील समोर आले होते. आता अखेर हे मॉडेल कंपनीने अधिकृतरित्या भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. याचे मूल्य १६,९९० रूपये असून हा स्मार्टफोन आजपासून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे ड्युअल कॅमेरा सेटअप होय. अनेक कंपन्या मिड-रेंजमधील स्मार्टफोनमध्ये हे फिचर देत असून सॅमसंगनेही या मॉडेलच्या माध्यमातून हाच मार्ग पत्करल्याचे दिसून येत आहे. याच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशयुक्त १३ व ५ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील आहे. दोन्हींच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या प्रतिमा काढता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी जे७ ड्युओ या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा (१२८० बाय ७२० पिक्सल्स) सुपर अमोलेड या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला असून यावर २.५ डी वक्राकार ग्लासचे आवरण प्रदान करण्यात आले आहे. यात ऑक्टा-कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.
सॅमसंग गॅलेक्सी जे७ ड्युओ या मॉडेलमध्ये ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरिओ या अद्ययावत आवृत्तीवर चालणारा आहे. यात फिजीकल होम बटन देण्यात आले आहे. तसेच यामध्ये सॅमसंग कंपनीने विकसित केलेली बिक्सबी हा डिजीटल असिस्टंट दिलेला असून एका बटनाच्या माध्यमातून याला कार्यान्वित करण्याची सुविधा देण्यात आली आहे.