Twitter New Rules : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचा ताबा इलॉन मस्क यांच्याकडे आल्यापासून ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. मस्क यांनी अनेकदा वेगवेगळे नियम लागू करून ट्विटरला प्रसिद्धीच्या झोतात ठेवले. अशातच शनिवारी त्यांनी एक मोठी घोषणा करत सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी केलेल्या घोषणेनुसार, आता ट्विटरवर एका दिवसात वाचल्या जाणाऱ्या पोस्टवर तात्पुरत्या (Twitter Temporary Limit) मर्यादा घालण्यात आल्या आहेत.
डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिपुलेशनचा सामना करण्यासाठी आम्ही या तात्पुरत्या मर्यादा लागू केल्या असल्याचे मस्क यांनी सांगितले आहे. सत्यापित खाती असलेले युजर्स (Verified accounts) एका दिवसात ६ हजार पोस्ट वाचू शकतात. तसेच असत्यापित खाती (Unverified accounts) असलेल्या युजर्संना दररोज ६०० पोस्ट वाचता येणार आहेत. याशिवाय नवीन असत्यापित खाती असलेल्या युजर्संना दिवसाला ३०० पोस्ट वाचता येणार आहेत. डेटा स्क्रॅपिंगमुळे हा कठोर निर्णय घेतला असल्याचे इलॉन मस्क यांनी सांगितले आहे. लक्षणीय बाब म्हणजे लवकरच या मर्यादेत वाढ करण्यात येणार असल्याचेही मस्क यांनी स्पष्ट केले.
दुसर्या ट्विटमध्ये मस्क म्हणाले की, सत्यापित खात्यांची मर्यादा लवकरच ८००० एवढी वाढवणार आहोत. तर असत्यापित खात्यांना दिवसाला ८०० आणि नवीन असत्यापित खात्यांना दिवसाला ४०० पोस्ट वाचता येणार आहेत.