नवी दिल्ली : इलॉन मस्क यांनी ट्विटर (Twitter) विकत घेतल्यानंतर दररोज काही नवीन अपडेट्स येत आहेत. अशा परिस्थितीत इलॉन मस्क यांनी सोमवारी सकाळी आणखी एक मोठी बातमी ट्विट्सद्वारे केली आहे. इलॉन मस्क यांचे ट्विट्स हे ट्विटर खाते निलंबित (अकाउंट सस्पेंड) होण्याशी संबंधित आहे. त्यांनी सलग तीन ट्विट्स केले आहेत.
इलॉन मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपली ओळख बदलणारे प्रत्येक अकाउंट सस्पेंड केले जाईल. पॅरोडी अकाउंट असल्यास ते पॅरोडी अकाउंट आहे असे स्पष्टपणे लिहावे, अन्यथा कोणाचे नाव किंवा फोटो वापरणारे अकाउंट सस्पेंड केले जाईल. आम्ही अकाउंट सस्पेंड करण्यापूर्वी एक चेतावणी दिली होती, परंतु आता आम्ही व्यापक पडताळणी सुरू करत आहोत. त्यानुसार, कोणतीही चेतावणी दिली जाणार नाही आणि अकाउंट थेट सस्पेंड केले जाईल. तसेच ट्विटर ब्लूवर साइन अप करण्याची अट म्हणून हे स्पष्टपणे ओळखले जाईल असे इलॉन मस्क यांनी म्हटले आहे.
याशिवाय, जर कोणी ट्विटर युजरनेम बदलले तर त्याचे ब्लू टिक तात्पुरते काढून टाकले जाईल, असेही इलॉन मस्क यांनी म्हटले आहे. दरम्यान, अलीकडे असे देखील दिसून आले आहे की, अनेक अकाउंट सस्पेंड केली गेली आहेत, जी दुसऱ्याचे पॅरोडी अकाउंट म्हणून काम करत आहेत. खरंतर, इलॉन मस्क यांच्या नावानेही अनेक ट्विटर अकाउंट्स सुरू होती, जी सतत सस्पेंड केली जात आहेत. असेच एक पॅरोडी अकाउंट इलॉन मस्क यांच्या नावाने हिंदी भाषेतही चालू होते. ते अकाउंट इयान वूलफोर्डचे (Ian Woolford) होते, हे अकाउंट देखील सस्पेंड करण्यात आले आहे.
हिंदीत ट्विट करणारे मस्क यांचे अकाउंट सुद्धा असेच बनवले होतेइयान वुलफोर्ड यांनी आपल्या ट्विटर अकाउंटचे नाव बदलून इलॉन मस्क ठेवले होते आणि प्रोफाइल आणि कलर फोटो देखील मस्क यांचा वापरला होता. त्याचे अकाउंट व्हेरिफाय झाल्यापासून अनेकांना इलॉन मस्क यांचे अकाउंट हॅक झाल्याचे वाटत होते. इयान वूलफोर्ड हे सतत इलॉन मस्क यांच्या नावाने ट्विट करत होते, त्यानंतर त्यांचे अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. इयान वूलफोर्ड यांनी इलॉन मस्क यांच्या नावाने हिंदी आणि भोजपुरी अशा दोन्ही भाषेत अनेक ट्विट केले होते.