रॉकेट कंपनी स्पेस-एक्सचे संस्थापक इलॉन मस्क नेहमीच चर्चेत असतात. ट्विटरचे मालकी हक्क मिळाल्यानंतर मस्क ट्विटरमध्ये नवनवे बदल करण्यावर भर देत आहेत. पण एका प्रश्नमंजुषेत (Q&A सेशन) मस्क यांनी एक असं विधान केलं की ज्याची जोरदार चर्चा आता सुरू आहे. ट्विटरचे प्रमुख मस्क यांनी नुकतंच मेंटल हेल्थ आणि सेफ्टी या विषयावर चर्चा केली.
५१ वर्षीय इलॉन मस्क यांनी सांगितलं की त्यांची मानस्थिक स्थिती एकदम उत्तम आहे. आपण आत्महत्या करण्याबाबत कधीच विचार करू शकत नाही. माझ्याबाबत चुकूनही कधी आत्महत्या केल्याची बातमी आलीच तर त्यात अजिबात तथ्य नसेल, कारण मी असा निर्णय कधीच घेणार नाही, असं इलॉन मस्क म्हणाले. यासंबंधीचा एक प्रश्न यूझरनं मस्क यांना विचारला होता.
इलॉन मस्क सोशल मीडियात यूझर्सच्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं देत असतात. याही वेळी मस्क यांनी यूझर्सच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. यात १ लाख लोक मस्क यांना ऐकत होती. "तुम्हाला आत्महत्येचा विचार येईल का?", असं एका यूझरनं मस्क यांना विचारलं. त्यावर "मी स्वत:ला संपवू शकत नाही", असं मस्क म्हणाले.
जर स्वत:चा जीव घेण्याबाबत काही माहिती समोर आली तर ती अजिबात खरी नसेल, असं मस्क म्हणाले आहे. ट्विटरच्या माहितीनुसार मस्क यांची ट्विटर स्पेसमधील मुलाखत १.८ मिलियनहून अधिक लोकांनी ऐकली आहे. यात मस्क यांनी Twitter Files बाबत आपली भूमिका मांडली आहे. तसंच फ्री स्पीचला आपला पूर्णपणे पाठिंबा असल्याचं मस्क यांनी म्हटलं आहे.