नवी दिल्ली-
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्कनं (Elon Musk) ट्विटरसोबतची डील अखेर रद्द केल्याची घोषणा केली आहे. इलॉन मस्कनं २५ एप्रिल रोजी Twitter या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची ५४.२० बिलियन डॉलर्सला खरेदी करण्याची ऑफर दिली होती. दरम्यान ही डील काही कालावधीनं ४४ बिलियन डॉलरमध्ये निश्चित करण्यात आली होती. आता इलॉन मस्कनं ट्विटर खरेदी करण्यापासून आपले हात पूर्णपणे झटकले आहेत. त्यामुळे ट्विटर कंपनीनं आता इलॉन मस्कला कोर्टात खेचण्याची तयारी केली आहे.
गेल्या अनेक आठवड्यांपासून तंत्रज्ञान विश्वास सुरू असलेला हा हायव्होल्टेज ड्रामा आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे. ट्विटरनं करारातील अनेक तरतुदींचं उल्लंघन केल्याचा आरोप इलॉन मस्क यांनी केला आहे. त्यामुळे आपण ट्विटर खरेदी करण्याचा करार रद्द करत असल्याचं मस्कनं जाहीर केलं आहे.
इलॉन मस्कच्या वकिलांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. "मस्क यांनी ट्विटरसोबतचा करार आता रद्द केला आहे. ट्विटरनं करारांमधील अनेक तरतुदींचं उल्लंघन केल्यानं मस्क यांनी या निर्णय घेतला आहे. ट्विटरनं मस्क यांच्यासमोर कंपनीचं चुकीचं आणि डोळ्यात धूळफेक करणारं प्रेझंटेशन केलं. त्यावर मस्क यांनी डोळे झाकून विश्वास ठेवला होता", असं मस्क यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.
ट्विटर कंपनी आता कोर्टात जाणारमस्क यांच्याकडून करार रद्द करत असल्याची घोषणा झाल्यानंतर ट्विटरनंही आता टोकाची भूमिका घेतली आहे. कंपनीला ही डील पूर्ण करण्याची इच्छा आहे आणि कायदेशीर गोष्टीचं पालन करुन यासाठी आम्ही कोर्टातही जाण्याची तयारी करत आहोत, असं ट्विटरकडून सांगण्यात आलं आहे.
Twitter चे चेअरमन Bret Taylor यांनी यासंदर्भात एक ट्विट देखील केलं आहे. "ट्विटरचे बोर्ड सदस्य इलॉन मस्क यांच्यासोबत करण्यात आलेल्या करारानुसार निमय, अटी आणि ठरलेल्याच किमतीवर डील पूर्णत्वास नेण्यास कटीबद्ध आहे. ही डील पूर्ण व्हावी यासाठी आम्ही आता कायदेशीर कारवाईचाही मार्ग अवलंबणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की यात आम्हाला यश येईल", असं ट्विटरच्या चेअरमन Bret Taylor यांनी म्हटलं आहे.