नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि ट्विटरचे (Twitter) मालक इलॉन मस्क (Elon Musk) कोणत्या-ना-कोणत्या कारणावरून चर्चेत आहेत. यावेळी त्यांनी एक ट्विट केले आहे. यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. ट्विटरवर त्यांनी आपल्या बेडसाइड टेबलचा फोटो पोस्ट केला असून, 'कोस्टरच्या अभावासाठी कारण नाही' असे लिहिले आहे. या फोटोमध्ये दोन रिव्हॉल्व्हर दाखवले आहेत, जे फिल्मी खेळण्यांसारखे दिसतात. तसेच, डाएट कोकचे काही रिकामे कॅन ठेवले आहेत. याशिवाय, एका दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी कोस्टरच्या कमतरतेबद्दल माफी मागितली.
इलॉन मस्क यांच्या या ट्विटला काही वेळातच जवळपास 70,000 लाईक्स आणि 5000 हून अधिक रिट्विट्स आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत. रिव्हॉल्व्हरचा फोटो पोस्ट केल्याबद्दल काही जण त्यांना गन कल्चरचा समर्थक म्हणत आहेत, तर काहींनी कोक पिण्यावर कमेंट केली आहे. एका युजरने म्हटले की, "तुम्ही मानवता आणि शांततेचे पुरस्कर्ते आहात, मग हे रिव्हॉल्व्हर कशासाठी." याचबरोबर, "ट्विटर कंपनी टॉक" मधील काही स्लाइड्स शेअर केल्या. हेट स्पीच इंप्रेशन ड्रॉपिंगपासून ते ट्विटरवरील ब्लू व्हेरिफाईड पुन्हा लाँच करण्यापर्यंत इलॉन मस्क यांच्या "ट्विटर 2.0 द एव्हरीथिंग अॅप" स्लाइड्सने बरेच लक्ष वेधून घेतले.
दरम्यान, ट्विटरने व्हेरिफाय साइन तात्पुरत्या स्वरूपात पुढील आठवड्यात रोल आउट करण्याची योजना आखली आहे. इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही घोषणा केली आहे. "उशीर झाल्याबद्दल क्षमस्व, आम्ही पुढील आठवड्यात शुक्रवारी व्हेरिफाईड लाँच करत आहोत. कंपन्यांसाठी सोन्याचा चेक, सरकारसाठी ग्रे चेक, व्यक्तींसाठी ब्ल्यू चेक (सेलिब्रेटी किंवा नाही) आणि चेक सक्रिय होण्यापूर्वी सर्व व्हेरिफाईड अकाउंट म्यॅन्युअल स्वरूपात प्रमानित केली जातील. हे त्रासदायक आहे, परंतु आवश्यक आहे", असे इलॉन मस्क यांनी म्हटले आहे.