टेस्लाचे सीईओ आणि जगप्रसिद्ध अब्जाधीश इलॉन मस्क आज मोठा व्यवहार करणार आहेत. यामुळे सोशल मीडियात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कदाचित ट्विटर आज मध्यरात्रीपासून मस्क यांचे होण्याची शक्यता आहे.
मस्क यांनी काही दिवसांरपूर्वी ट्विटरच विकत घेण्याचा प्रस्ताव सादर केला होता. प्रति शेअरमागे 54.20 डॉलर मोजण्यासही ते तयार आहेत. मात्र, ट्विटरने यावर थोडी कठोर भूमिका घेतली होती. मस्क यांना त्यापूर्वीच संचालक पदावर घेण्यास नकार दिला होता. परंतू, एवढी मोठी रक्कम पाहून ट्विटरने मस्क यांची ऑफर सकारात्मक घेतली आहे.
आज ट्विटरच्या बोर्डाची महत्वाची बैठक आहे, त्यात यावर निर्णय होणार आहे. या संबंधीत एका अधिकाऱ्याने सांगितले की, ट्विटर ही ऑफर जवळजवळ स्वीकारणार आहे. शेअरधारकांच्या व्यवहाराच्या शिफारशीनंतर बोर्डाच्या बैठकीत जे ठरेल त्याची घोषणा आज रात्री मध्यरात्र उलटल्यानंतर होण्याची शक्यता आहे. सकारात्मक असले तरी ही ऑफर शेवटच्या क्षणी फेटाळली जाण्याची देखील शक्यता आहे.
मस्क यांना ट्विटरमध्ये १०० टक्के मालकी हक्क विकत घ्यायचे आहेत. यासाठी त्यांनी एका शेअरमागे 54.20 डॉलर मोजण्याची तयारी दर्शविली आहे. ट्विटरसाठी ते 41 अब्ज डॉलर मोजायला तयार आहेत. गेल्याच आठवड्यात एलन मस्क हे ट्विटरच्या बोर्डावर येणार असल्याचे वृत्त आले होते. यानंतर मस्क यांनी ट्विटरशी निगडीत काही पोस्ट आणि मतांचे कौलही घेण्य़ास सुरुवात केली होती. यामध्ये ट्विट एडिट करण्याचा पोल देखील होता. ज्याची मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे.