ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क यांनी शुक्रवारी महत्वाची घोषणा करताना २ डिसेंबर रोजी Verified नावाचं नवं व्हेरिफिकेशन फिचर लॉन्च करणार असल्याची माहिती दिली आहे. कंपन्यांसाठी गोल्डन रंगाचं टिक, सरकारसाठी ग्रे रंगाचं, वैयक्तिक हँडल्ससाठी निळ्या रंगाचं टिक आता ट्विटरवर दिसणार आहे. हे फिचर सुरू होण्याआधी सर्व अकाऊंट्सची सत्यता पडताळणी देखील केली जाईल.
नवं फिचर लॉन्च करण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईबाबत देखील मस्क यांनी माफी मागितली. पुढील आठवड्यात शुक्रवार २ डिसेंबर रोजी व्हेरिफाईड फिचर लाँच करत असल्याचं त्यांनी सांगितलं. बनावट खात्यांमुळे कंपनीनं नुकतीच जाहीर केलेली ८ डॉलर ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा बंद केली होती आणि मागणीनुसार ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा २९ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू केली जाईल असं सांगितलं होतं. ब्लू टिक मार्क याआधी राजकारणी, सेलिब्रिटी, पत्रकार आणि इतर सार्वजनिक व्यक्तींच्या हँडल्ससाठी राखीव होता.
यूझर्ससाठी घेतला मोठा निर्णयइलॉन मस्क यांनी ट्विटरवर बॅन करण्यात आलेल्या हँडल्सना पुन्हा सुरू करणार आहेत. यासाठी आधी संबंधित हँडल्सची माहिती जाणून घेतली जाणार आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर हँडल नुकतंच पुन्हा सुरू करण्यात आलं होतं. त्याचपद्धतीनं इतर निलंबित खाती पुन्हा सुरू केली जाणार आहेत. हा निर्णय घेण्यापूर्वी मस्क यांनी एक पोल घेऊन लोकांचं मत जाणून घेतलं होतं. २४ नोव्हेंबर रोजी मस्क यांनी एक ऑनलाइन पोल घेत ट्विटरनं सस्पेंड केलेल्या अकाऊंटला पुन्हा सुरू केलं जावं का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ७१.४% लोकांनी 'होय' असं उत्तर दिलं होतं.
येत्या आठवड्यात सुरू होतील बंद अकाऊंट्सट्विटर पोलच्या निकालानंतर इलॉन मस्क यांनीही त्यांच्या वतीनं एक नवं ट्विट केलं. गुरुवारी उशिरा इलॉन मस्क यांनी ट्विट केलं की जनतेला जे हवं आहे तेच होईल. Twitter वापरकर्त्यांच्या निलंबित अकाऊंट्स पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला असेल तर पुढील आठवड्यापासून याबाबतची हालचाल सुरू होईल. हळूहळू बंद अकाऊंट्स पुन्हा सुरू केली जातील, अशीही माहिती देण्यात आली आहे.