Elon Musk : दिग्गज उद्योगपती इलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वी Twitter) खरेदी केल्यापासून, यात अनेक मोठे बदल केले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ट्विटरचे नाव बदलून X केले, त्यानंतर यात कंटेट क्रिएटर्स आणि पत्रकारांसाठी कमाईचा पर्याय उपलब्ध करुन दिला. त्यानंतर आता नवीन फीचर जोडले जाणार आहे.
कोणते फीचर आणणार?इलॉन मस्क यांनी आज X वर पोस्ट करत सांगितले की, लवकरच X(ट्विटर) वर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग फीचर जोडले जाणार आहे. अॅपल आयफोन आणि मॅकसह अँड्रॉईड स्मार्टफोन वापरणार्यांनाही हे फीचर मिळणार आहे. महत्वाची बाब म्हणजे, ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलिंगसाठी फोन नंबरची गरज नसेल.
दरम्यान, हे नवीन फीचर कधी सुरू होणार, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पण, सध्या यावर काम सुरू असून, लवकरच हे फीचर नवीन अपडेटमध्ये जोडले जाईल, असा अंदाज तज्ज्ञांचा आहे. हे फीचर आल्यानंतर X मोठी क्रांती घडवेल, कारण नंबरशिवाय कॉल करणारे एकही अॅप सध्या बाजारात उपलब्ध नाही.