शब्द हरवले आहेत...हो खरंच... म्हणजे हल्ली शब्दांची जागा सांकेतिक भाषेनं घेतली आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅप एकूणच सोशल मीडियावर जिकडेतिकडे इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मौज, मस्करी, राग, प्रेम यांसारख्या कोणत्याही भावना व्यक्त करायच्या असल्यास 'इमोटिकॉन्स'/'इमोजी'चा भडीमार केला जातो. ज्या पद्धतीनं मेसेजींगमध्ये क्रांती झालीय त्यानुसार 'व्यक्त होणार तर इमोजीतूनच... नाही तर नाहीच', असा पणच काहींनी केलाय की काय, असा प्रश्नच पडतोय. इमोजीच्या माध्यमातूनच भावना व्यक्त करण्याचा जमाना आहे, असंच म्हणावे लागेल.
इमोजीचा नेहमी हलक्याफुलक्या, मौजमजेच्या संभाषणासाठी वापर केला जातो, असाच बऱ्याच जणांचा समज आहे. पण खरं तर तसे नाहीय. वाक्याच्या शेवटी किंवा वाक्याच्या अधे-मधे इमोजीचा वापर होत असल्यास, प्रत्येक वेळेस याचा अर्थ गंमतीशीर ठरू शकत नाही. इमोजीमुळे संभाषणाचा तसंच वाक्यरचनेचा अर्थ कधी-कधी बदलूही शकतो. उदाहरणार्थ गंभीर, उपरोधिकही होऊ शकतो, असे निरीक्षण एका अभ्यासाद्वारे नोंदवण्यात आले आहे.
मानवी मेंदू ज्या प्रमाणे भाषेचा उपरोधिक भावना, टोमणे, टोला, टीका करण्यासाठी वापर करतो, त्याचप्रमाणे इमोजीचाही वापर होतो. एखाद्या इमोजीच्या वापरामुळे वाक्यामागील संपूर्ण अर्थ, भावना, गांभीर्य समजते, असे सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. इमोजी हे सर्वव्यापी आहे. केवळ सोशल मीडिया, मेसेज, ऑनलाइन चॅटिंगमध्येच नव्हे तर लेखी पत्र किंवा एखाद्या मेजेस तसंच मजकुरातही हल्ली इमोजीचा वापर आपण पाहतो, असे University of Illinois (US)मधील डॉक्टरेट विद्यार्थी बेंजामिन वाईसमन यांनी सांगितले.
शब्दांसहीत इमोजी वापर करणे हे एक प्रकारे Multimodal संभाषणाचे कौशल्य असल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे. यापद्धतीनं शब्द आणि हातवारे किंवा शब्द आणि चेहऱ्यावरील हावभाव हेदेखील Multimodal संभाषणाचे कौशल्य असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. ज्याप्रकारे आपण बोलून उपरोधिक किंवा कठोर-कटू भावना व्यक्त करू शकतो, त्याच पद्धतीनं इमोजीचा वापर करुनही या भावना व्यक्त होतात, असेही बेंजामिन यांनी सांगितले.
इमोजीच्या वापरासंदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी 106 जणांचा अभ्यासकांनी निरीक्षण केले. याद्वारे त्यांनी या सर्वांना इमोजीनंतरचे वाक्य वाचण्यास सांगितले व यावेळेस त्यांच्या मेंदूचाही अभ्यास करण्यात आला. शिवाय, प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं वाक्यांचा काय अर्थ नोंदवून घेतला, हेदेखील त्यांना विचारण्यात आले. काही उदाहरणांमध्ये इमोजीद्वारे वाक्याचा शाब्दिक अर्थ जुळला, पण काही ठिकाणी इमोजीचा वापर उपरोधिकरित्या करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, शब्द, शब्द आणि चित्र, शब्द आणि हातवारे तसंच शब्द आणि इमोजी यांच्या वापरामुळे आपले संवाद कौशल्य वाढण्यास मदत होत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. संभाषणात आपण केवळ वेगवेगळ्या इमोजीचा वापरू शकत नाही, मात्र जेव्हा आपण शब्दांसोबत इमोजीचा वापर करतो, तेव्हा ते एकमेकांचे महत्त्व वाढवतात. एकूणच शब्द आणि इमोजीच्या एकत्रित वापरामुळे संभाषण कौशल्याबाबत योग्य तो परिणाम जाणवतो, असे अभ्यासकांनी सांगितले.
Emoji आधी व्हायचा emoticons चा वापरइमोजीचा जन्म १९९० मध्ये झाला आणि यांना आधी emoticons असे म्हटले जायचं. emoticons (emotion + icon) या दोन शब्दांपासून तयार करण्यात आला होता. याचा वापर टेक्स्टच्या जागी केला जायचा. इमोजीला जपानी एक्स्प्रेशनही म्हटलं जातं.
कोणी केले इमोजी तयार?१९९० मध्ये Shigetaka Kurita ने पहिला इमोजी तयार केला होता. Shigetaka Kuritaने हा इमोजी असलेला फोटो जपानच्या NTT Docomo या टेलिकॉम कंपनीसाठी तयार केला होता. लहान मुलांना व्यस्त ठेवण्याचा याचा उद्देश होता.