प्रदुषणामुळे जगातील मोठमोठी शहरे त्रस्त झाली आहेत. शांघाय, दिल्लीसह अनेक शहरे बहुंतांशवेळा धुरक्याच्या छायेत असतात. शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. यामुळे लोकांना शुद्ध हवे ऐवजी अशुद्ध हवा मिळत आहे. विविध सरकारे प्रदूषण कमी करण्यासाठी कोटींवर वृक्ष लागवड करत आहेत. मात्र, यावरच थांबतील ते इंजिनिअर कसले. त्यांनी कृत्रिम कल्पवृक्षाचीच निर्मिती केली आहे.
मेक्सिकोच्या इंजिनिअरांनी एक रोबोटिक वृक्ष बनविला आहे. या वृक्षाचे नाव बायोअर्बन आहे. हा वृक्ष दररोज 2890 लोकांना शुद्ध हवा देऊ शकतो. या रोबोटिक वृक्षाच्या इंजिनिअरांचा दावा आहे की, हा वृक्ष खऱ्या वृक्षांसारखे काम करतो. वातावरणातून प्रदूषित हवा शोषून घेऊन त्यावर प्रक्रिया करत स्वच्छ हवा बाहेर सोडतो. हा वृक्ष दिवसाला 2890 जणांना हवा देतो. या वृक्षामध्ये असे एक मशीन आहे जे प्रदूषित हवा साफ करते.
या वृक्षाची उंची 14 फूट आहे. यामध्ये हवा साफ करून वायुमंडळात सोडण्यासाठी फोटोसिंथेसिस सिस्टिम वापरण्यात आली आहे. इंजिनिअरांच्या दाव्यानुसार हा वृक्ष खऱ्या 368 वृक्षांएवढे काम करतो. हा रोबोटित कल्पवृक्ष सध्या मेक्सिकोच्या प्युबेला शहरामध्ये लावण्यात आला आहे. यासाठी 35 लाख रुपयांचा खर्च आला आहे.