मुंबई : साधारण 15-16 वर्षांपूर्वी देशात मोबाईल सेवेने बाळसे धरले होते. यावेळी सिमकार्डही सहजासहजी मिळत नव्हते. मिळालेच तर तब्बल 1000 रुपये मोजून लाईफटाईम व्हॅलिडिटी दिली जात होती. अनेकांनी एवढी रक्कम भरून सरकारी दूरसंचार कंपनीसह खासगी कंपन्याची सिमकार्ड घेतली होती. यावेळी इन्कमिंग मोफत दिले जात होते. मात्र, आता दर महिन्याला 35 रुपयांचे रिचार्ज करण्याची बळजबरी करण्यात येत असून न केल्यास आऊटगोईंगसह इनकमिंगही बंद करण्यात येत आहे. ट्रायने तंबी देऊनही कंपन्या मनमानी कारभार करत आहेत. या लुटीबाबत एका ग्राहकाने आयडीया या टेलिकॉम कंपनीच्या प्रतिनिधीला जाब विचारला. मात्र, त्यांना याबाबतचा खुलासा करता आलेला नाही.
एका ग्राहकाने आयडियाच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीशी फोन करून चर्चा केली. यावेळी ग्राहकाने त्यांना लाईफटाईम व्हॅलिडीटीच्या सुविधेसाठी 2005 मध्ये 500 आणि 1000 रुपये आकारले होते. या पैशांचे काय झाले याबाबत जाब विचारला. एवढे पैसे घेऊनही आता 35 रुपये का आकारले जात आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी कंपनीच्या प्रतिनिधीने बिनबुडाची उत्तरे देत नवीन नियम आल्याची टेप सुरुच ठेवत उत्तर देण्याचे टाळले.
या सजग ग्राहकाने मागच्या पैशांचे काय, लाखो ग्राहकांकडून तेव्हा करोडोंनी पैसे गोळा केले त्याचे काय, असा प्रश्न उपस्थित केला. यावर त्या प्रतिनिधीने आमच्याकडे तीन महिन्यांचीच माहिती उपलब्ध असल्याचे उडवाउडवीचे उत्तर दिले. तसेच वरिष्ठ अधिकारी कार्यालयात नसल्याचे सांगत आता 2018 साल सुरु असून तुम्ही 2007 ची माहिती मागत असल्याचे उलट उत्तर दिले. तसेच 35 रुपयाचे रिचार्ज केल्यावरच फोन सेवा सुरु होईल असे सांगितले. यावर ग्राहकाने आयडियामध्ये सिमकार्ड कधी घेतले याबाबत विचारले असता त्यांनी 2003 मध्ये सिम खरेदी केल्याचे मात्र अचूक सांगितले. मग 1000 रुपयांचे रिचार्ज केल्याचे मान्य आहे का असे विचारल्यावर मात्र, त्या प्रतिनिधीने 1000 रुपयांचे रिचार्ज केल्याचे मान्य नसल्याचे सांगत हात झटकले. तसेच तुम्ही आजवर हजारो रिचार्ज केली असतील, आता ते कसे शोधणार असे सौम्य भाषेत सांगत उत्तर देण्याचे टाळले. यावर कंपन्या लुटालूट करत असून आमची माहीतीही लपवत असल्याचा आरोप करत ग्राहक मंचात जावे लागेल असा इशारा या ग्राहकाने दिला.
ग्राहक सेवा प्रतिनिधीला विचारलेला जाब ऐका खालील लिंकवर :
अशा प्रकारे मोबाईल कंपन्या ग्राहकांची लूट करत असून काही वर्षांपूर्वी हजार रुपये खर्चून लाईफटाईम व्हॅलिडिटी घेतली जात असताना आता 35 रुपयांच्या रिचार्जची बळजबरी करण्यात येत आहे. मात्र, आऊटगोईंगसोबत इनकमिंगही बंद करत असल्याने ग्राहकांना नाईलाजाने दर महिन्याला रिचार्ज मारावे लागत आहे. ही ग्राहकांची फसवणूक असून तेव्हाचे मोबाईल सध्याच्या ग्राहकांकडे नसल्याने याचा फायदा कंपन्या घेत आहेत. यामध्ये सरकारी कंपन्याही सहभागी आहेत.
जुने नियम कंपन्यांकडून पायदळीनवीन नियम आल्याचे सांगत जुने नियम पायदळी तुडविण्यात येत आहेत. कायद्यानुसार जुन्या प्रकरणांना नवीन नियम लागू होत नाहीत. नवीन नियम हे त्यानंतर होणाऱ्या गोष्टींवर लागू होतात. मात्र, कंपन्या याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. यामुळे कंपन्यांचे प्रतिनिधी अर्धवट माहितीच्या आधारे नवीन नियम आल्याचे सांगत जुन्या ग्राहकांना वाऱ्यावर सोडत आहेत.
लाईफटाईम व्हॅलिडिटी म्हणजे किती? मरेपर्यंत का?लाईफटाईम व्हॅलिडिटी म्हणजे मरेपर्यंत व्हॅलिडिटी नसते. आरटीओ जेव्हा वाहन चालविण्याचा परवाना देते तेव्हा त्याची व्हॅलिडिटी ही 20 वर्षांची असते. अशाच प्रकारे टेलिकॉम कंपन्याही तेव्हा व्हॅलिडिटी देत होत्या. हा काळ 20 ते 30 वर्षांचा होता.