- प्रसाद ताम्हनकरअन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाइल या मानवाच्या आधुनिक काळातील चार प्रमुख गरजा बनल्याचे बरेचदा गमतीने म्हटले जाते. मोबाइलने संभाषणाच्या सुविधेबरोबर टीव्ही, संगणक, हेल्थ केअर अशा अनेक उपकरणांची जागा घेतलेली आहे. एवढ्या सोयीचा असूनदेखील या मोबाइलचे अनेक धोके सातत्याने समोर येत असतात. या धोक्यांमधील सर्वात मोठा धोका म्हणजे मोबाइलची स्फोट होणारी बॅटरी आणि तिच्यामुळे होणारे शारीरिक आणि आर्थिक नुकसान.
मोबाइलची बॅटरी फुटण्याच्या घटना सध्या सातत्याने समोर येत आहेत. अनेक लोकप्रिय आणि तंत्रज्ञानात दिग्गज समजल्या जाणाऱ्या मोबाइल उत्पादक कंपन्यांच्या मोबाइलच्या बॅटऱ्यादेखील फुटण्याचे प्रकार जगभरात घडत आहेत. या सर्वच उत्पादक कंपन्या या अपघातांसाठी मोबाइल वापरकर्त्यांच्या निष्काळजीपणाला दोष देऊन या अपघातांपासून स्वत:ला वेगळे करीत आहेत. पण खरेच अशा बॅटरी ब्लास्ट प्रकरणांमध्ये मोबाइल वापरणाऱ्यांचा किती दोष असतो? मोबाइल आणि बॅटरी उत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञांचा मतानुसार मोबाइल वापरकर्त्यांनी थोडी सावधगिरी बाळगली तरी अशा अनेक अपघातांना सहजपणे टाळता येणे शक्य आहे. यासाठी सर्वात आधी मोबाइलची बॅटरी फुटण्यामागे कोणती प्रमुख कारणे आहेत, याची माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे.
मोबाइलची बॅटरी फुटण्यामागचे सर्वात प्रमुख कारण ’डॅमेज बॅटरी’ हे असते, असे समोर आले आहे. बरेचदा मोबाइल हाताळताना तो आपल्या हातून खाली पडतो. त्यामुळे बॅटरी डॅमेज होण्याचा संभव असतो. अशा नादुरुस्त बॅटरीमुळे मोबाइल ओव्हर हिट होण्याचा किंवा शॉर्टसर्किट होण्याचा जास्ती धोका असतो. अशा बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट झाले किंवा ती ओव्हर हिट व्हायला लागली तर बॅटरी फुगते. सामान्य डोळ्यांनादेखील अशी फुगलेली बॅटरी दिसू शकते. अशा वेळी अधिकृत सर्व्हिस सेंटरमधून ती लगेच बदलून घ्यावी. या जोडीलाच कायम मोबाइल चार्ज करताना ओरिजनल चार्जरचा वापर करावा. लोकल कंपनीचे चार्जर वापरल्यास मोबाइल बॅटरीच्या आतील पार्ट्सला धोका पोहोचण्याची खूप शक्यता असते. तसेच मोबाइल दुरुस्तीचे कोणतेही काम असल्यास ते शक्यतो उत्पादक कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमधूनच करून घ्यावे. अशा छोट्या छोट्या काळज्या अनेक गंभीर अपघातांपासून आपल्याला सुरक्षित ठेवू शकतात.(prasad.tamhankar@gmail.com)