फेसबुकचा अल्गोरिदम अत्यल्प प्रमाणात द्वेषमूलक पोस्ट काढून टाकत असल्याचा आरोप कंपनीनं फेटाळला आहे. द्वेषपूर्ण पोस्ट काढून टाकण्यासाठी स्वयंचलित यंत्रणेसोबतच इतर पद्धतीदेखील वापरत असल्याचं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे. फेसबुक वापरत असलेल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काढून टाकला जाणारा मजकूर अतिशय कमी असल्याचा दावा वॉल स्ट्रीट जर्नलनं लीक झालेल्या काही कागदपत्रांच्या आधारे केला होता.
फेसबुकवरील द्वेषपूर्ण पोस्टच्या संख्येत गेल्या काही महिन्यांपासून मोठी वाढ होत आहे. अनेक फेसबुक अकाऊंट्स केवळ याच कारणासाठी वापरली जात असल्याचे प्रकारदेखील समोर आले आहेत. याबद्दलचं वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलनं पुराव्यांच्या आधारे प्रसिद्ध केलं होतं. त्यावरून फेसबुकनं स्पष्टीकरण दिलं आहे. द्वेषपूर्ण मजकूर दूर करण्यात यश येत असल्याचं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे. फेसबुककडून वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानामुळे केवळ १ टक्का पोस्ट काढून टाकल्या जात असल्याची माहिती फेसबुक कर्मचाऱ्यांच्या टीम त्यांच्या कार्यालयात शेअर केली होती. त्यासंबंधीचे कागदपत्रं हाती लागल्याचा दावा वॉल स्ट्रीट जर्नलनं केला होता.
फेसबुकच्या वापरकर्त्यांकडून द्वेषपूर्ण मजकुराच्या तक्रारी केल्या जातात. त्या तक्रारी हाताळण्यासाठी दिला जाणारा वेळ फेसबुकनं कमी केल्याचा आरोपदेखील झाला आहे. हा बदल दोन वर्षांपूर्वी झाला. तेव्हापासून कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर जास्त अवलंबून राहू लागली. यामुळे बरंच यश मिळाल्याचा दावा कंपनीनं सार्वजनिकपणे केला. पण त्यात तथ्य नसल्याचा आरोप वॉल स्ट्रीट जर्नलनं केला आहे.
द्वेषपूर्ण मजकूर रोखण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप फेसबुकनं फेटाळला आहे. फेसबुकचे उपाध्यक्ष गाय रोसेन यांनी याबद्दलची कंपनीची भूमिका एका ब्लॉगच्या माध्यमातून स्पष्ट केली. या क्षेत्रातील फेसबुकची कामगिरी तपासण्यासाठी विविध मापदंडांचा विचार करायला हवा. फेसबुकवर द्वेषपूर्ण मजकूर पाहण्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे, असं रोसेन यांनी सांगितलं. यासोबतच त्यांनी काही आकडेवारीदेखील शेअर केली. सध्याच्या घडीला दर १० हजार व्ह्यूजमागे द्वेषपूर्ण पोस्टचे व्ह्यूज केवळ ५ आहेत. गेल्या ९ महिन्यांत द्वेषपूर्ण पोस्टचे व्ह्यूज निम्म्यानं कमी झाल्याची माहिती त्यांनी दिली.