नवी दिल्ली - फेसबुकच्या करोडो युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. 60 कोटी युजर्सचा पासवर्ड फेसबुकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती पडला त्यामुळे युजर्सची प्रायव्हसी धोक्यात आली होती. युजर्सचा डेटा चोरीला गेल्याची बाब समोर असतानाच आता कोट्यवधी फेसबुक युजर्सचा डेटा अॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक झाला होता. यानंतर सातत्याने डेटा लीक होत असल्याच्या अनेक घटना समोर येत असल्याने फेसबुक युजर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फेसबुकला तब्बल 5 बिलियन डॉलर्सचा दंड होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपासून फेसबुक युजर्सची सुरक्षितता धोक्यात आली आहे आणि याच कारणामुळे फेसबुकला अब्जावधींचा दंड होण्याची शक्यता आहे.
फेसबुक युजर्सची सुरक्षितता धोक्यात आल्याप्रकरणी सध्या फेसबुकची चौकशी सुरू आहे. फेडरल ट्रेंड कमिशन (FTC) याच अनुषंगाने 5 बिलियन डॉलर्सचा दंड ठोठावण्याची शक्यता असल्याचा अंदाज फेसबुकने व्यक्त केला आहे. फेसबुककडून एवढा मोठा दंड वसूल झाल्यास तो कंपनीच्या एका महिन्यांच्या उत्पन्ना एवढा असेल. परंतु अद्याप एफटीसीकडून याबाबत कोणताही घोषणा करण्यात आलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, केब्रिज अॅनालिटिका डेटा स्कँडलनंतर फेसबुकची चौकशी सुरू असून या प्रकरणी कंपनीने एफटीसीसोबत सेटलमेंट करण्यासाठी 3 बिलियन डॉलर्स वेगळे ठेवले होते. 2011 मध्ये फेसबुकने एफटीसीसोबत एक करार केला होता आणि त्या करारानुसार युजर्सच्या परवानगीशिवाय त्याची माहिती शेअर करणार नाही असे सांगितले होते. परंतु फेसबुकने या कराराचे उल्लंघन केल्याने सध्या चौकशी सुरू आहे. फेसबुकचे सीईओ डेव्ह वेनर यांच्या मते, या मुद्द्यावर तोडगा निघाला नाही तर दंडाची रक्कम किती असेल हे सांगता येत नाही.
फेसबुकचा पुन्हा 'घोळ'; 15 लाख युजर्सचे ई मेल कॉन्टॅक्ट्स केले अपलोड
फेसबुककडून अजाणतेपणी तब्बल 15 लाख युजर्सचे ई-मेल कॉन्टॅक्ट्स अपलोड झाले आहेत. मे 2016 पासून आतापर्यंत 'अजाणतेपणी' 15 लाख युजर्सचे ई-मेल कॉन्टॅक्ट्स अपलोड झाल्याची माहिती फेसबुकनेच दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 'फेसबुकने मार्चमध्ये पहिल्यांदा साइन-अप करणाऱ्या युजर्सना ई-मेल पासवर्ड व्हेरिफिकेशन ऑप्शन ऑफर बंद केली होती. अशा काही प्रकरणांत युजर्सने अकाउंट तयार केल्यानंतर त्याचे कॉन्टॅक्ट्स फेसबुकवर अपलोड झाले होते.' तसेच जवळपास 15 लाख युजर्सचे ईमेल कॉन्टॅक्ट अपलोड झाल्याची माहिती फेसबुकने रॉयटर्सला दिली आहे. हे कॉन्टॅक्ट कोणाशीही शेअर करण्यात आलेले नाहीत. आता ते डिलीट करण्याचं काम सुरू आहे अशी माहिती फेसबुकने दिली आहे. ज्या युजर्सचे कॉन्टॅक्ट्स अपलोड झाले आहेत त्यांना कंपनीकडून नोटिफिकेशन पाठवण्यात येणार आहे. ही समस्या आता सोडवण्यात आली असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
सावधान! फेसबुकवर रोज 10 लाख अकाऊंट होताहेत ब्लॉक
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या समर्थकांचा सोशल मीडियावरील वावर अधिक वाढला आहे. खोटी अकाऊंट्स आणि पेजेसचा वापर करून एकमेकांविरोधात फेक न्यूज आणि चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे. या पार्श्वभूमीवर फेसबुककडून कारवाई करण्यात येत आहे. सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक दिवसाला 10 लाख अकाऊंट ब्लॉक करत आहे. आर्टीफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि मशीन लर्निंग (ML) च्या मदतीने फेसबुक एका दिवसात 10 लाख फेक अकाऊंटवर कारवाई करत आहे. याआधी गेल्या आठवड्यात फेसबुकने कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जवळपास 700 पेज, ग्रुप आणि अकाऊंटवर कारवाई केली होती.
Facebook ने चुकून मार्क झुकेरबर्गच्याच पोस्ट केल्या डिलीट
काही दिवसांपूर्वी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गच्या काही जुन्या पोस्ट डिलीट झाल्याची माहिती समोर आली होती. फेसबुकने आपल्या पोस्टमध्ये टीमकडून चुकून डिलीट झाल्याचे स्पष्ट केले होते. फेसबुकडून आता मार्क झुकेरबर्ग याच्या 2007 आणि 2008 या दोन वर्षांतील काही पोस्ट डिलीट झाल्या आहेत. त्यामुळे झुकेरबर्ग याचे अकाऊंट सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य युजर्सचं काय, असा सवाल युजर्सकडून विचारला जात आहे. दरम्यान या सर्व पोस्ट चुकून डिलीट झाल्या असून त्या कंपनीच्या ब्लॉग किंवा न्युजरूममध्ये मिळू शकतील अशी माहिती फेसबुकच्या प्रवक्त्याने दिली होती.
कोट्यवधी फेसबुक युजर्सचा डेटा अॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक
फेसबुकच्या कोट्यवधी युजर्सचा डेटा अॅमेझॉनच्या क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हरवर लीक झाला आहे, असं संशोधकांचं म्हणणं आहे. सायबर स्पेस कंपनी अपगार्डच्या वृत्तानुसार, फेसबुकसाठी काम करणाऱ्या अन्य दोन कंपन्यांनी (थर्ड पार्टी) युजरचा डेटा अॅमेझॉनच्या सर्व्हरवर स्टोर केला आहे. तो डेटा सहजपणे इतरांना डाउनलोड करता येऊ शकतो. त्यातील एका कंपनीने 146 गीगाबाइट डेटा गोळा केला आहे. त्यात 540 मिनियन म्हणजेच 54 कोटी युजर्सच्या लाइक्स, कॉमेंट आणि अकाऊंटचा समावेश आहे. किती युजर्सच्या डेटाचा यामध्ये समावेश आहे याबाबत नेमकी आकडेवारी अद्याप समजू शकलेली नाही. तर दुसऱ्या अॅपने 22 हजार फेसबुक युजरचे 'अनप्रोटेक्टेड' पासवर्ड स्टोर केले आहेत.