नवी दिल्ली- दुनियेतील सर्वात मोठी सोशल मीडिया नेटवर्किंग साइट फेसबुकने 2018च्या सुरूवातीच्या तीन महिन्यात जवळपास 58 कोटी 30 लाख फेक अकाऊंट्स बंद केले आहेत. फेसबुकच्या कम्यूनिटी स्टँडर्डचं उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं फेसबुकचं म्हणणं आहे. लैंगिकता व हिंसकतेला उत्तेजन, प्रोत्साहन तसेच दहशतवाद व विद्वेषी भावना यांचा प्रसार करणाऱ्या काही कोटी पोस्टविरोधातही कारवाईचा बडगा उगारला आहे.
कँब्रिज अॅनालिटिकाच्या डेटा लिक प्रकरणानंतर वादात सापडलेल्या फेसबुकने दररोज सुरू केल्या जाणाऱ्या फेक अकाऊंडवर रोख लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. फेसबुककडून इतकी मोठी कारवाई होऊनही अजूनसुद्धा अॅक्टिव्ह अकाऊंट्सपैकी 3-4 टक्के प्रोफाइल फेक असल्याचं फेसबुकचं म्हणणं आहे.
दरम्यान, माहितीचा गैरवापर केल्याचा संशय असलेल्या २०० अॅपचा वापर फेसबुकने थांबवलाआहे. या अॅपच्या कारभाराची चौकशी फेसबुक करीत आहे. फेसबुकची साफसफाई करू आणि विघातक गोष्टींना बाहेरचा रस्ता दाखविला जाईल असं या कंपनीचे सीइओ मार्क झुकरबर्ग यांनी जाहीर केलं होतं.