केरळ : सोशल मीडियातील लोकप्रिय कंपनी फेसबुककडूनकेरळमधील एका 19 वर्षीय विद्यार्थ्याचा सन्मान करण्यात आला आहे. इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवरील 'बग' शोधल्याप्रकरणी हा सन्मान करण्यात आला आहे.
केरळमधील मातृभूमी या दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, व्हॉट्सअॅपवरील 'बग' शोधणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव के. एस. अनंतकृष्णा असे आहे. के. एस. अनंतकृष्णा हा येथील पठाणमथित्ता माउंट झीऑन कॉलेजध्ये बी.टेक शिकत आहे. त्याने दोन महिन्यांपूर्वी व्हॉट्सअॅपवरील फाईल्स युजर्सला माहीत नसताना काढता येतात, असा 'बग' शोधून काढला. यानंतर हा 'बग' व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या फेसबुकच्या निदर्शनास आणून दिला. तसेच, या 'बग' वर त्याने उपाय सुद्धा सुचविला होता.
दरम्यान, व्हॉट्सअॅपवरील 'बग' काढण्यासाठी फेसबुकने के. एस. अनंतकृष्णा याने सांगितलेला उपाय तपासून पाहिला. त्यानंतर दोन महिन्यानंतर ही चूक शोधून काढल्याबद्दल त्याचा सन्मान करण्याचे ठरविले. तसेच, के. एस. अनंतकृष्णा याला फेसबुकने आपल्या प्रतिष्ठित 'हॉल ऑफ फेम'मध्ये स्थान दिले. विशेष म्हणजे, फेसबुककडून आपल्या अॅप्लिकेशनमधील काही चुका किंवा व्हायरस यासंबंधी माहिती देणाऱ्यांना 'हॉल ऑफ फेम'मध्ये स्थान देण्यात येते. याशिवाय, बक्षीस म्हणून त्याला 500 डॉलर म्हणजेच जवळपास 34 हजार रुपये रोख देखील देण्यात आले.