फेसबुक या सोशल नेटवर्कींग साईटने आता ओएलएक्स, क्विकर आणि क्रेगलिस्ट आदींसारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी तयारी सुरू केली असून या अंतर्गत आपल्या मार्केटप्लेस या फिचरचा विस्तार सुरू केला आहे.
फेसबुक या संकेतस्थळाने सोशल नेटवर्कींगच्या पलीकडे जात आपल्या युजरला विविधांगी सुविधा देण्याचा सपाटा लावला आहे. आपल्या साईटला परिपूर्ण संकेतस्थळात परिवर्तीत करण्यासाठी फेसबुक करत असलेले प्रयत्न कुणापासून लपून राहिलेले नाहीत. विशेष करून फेसबुक हे ई-कॉमर्स पोर्टल बनावे यासाठी यासाठी अनेक फिचर प्रदान करण्यात आले आहेत. यात गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात फेसबुक मार्केटप्लेस या नावाने विशेष सुविधा सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले होते तेव्हा टेक्नो वर्ल्डमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्मित झाले होते. आधी ही सुविधा प्रायोगिक तत्वावर निवडक युजर्सला देण्यात आली होती. यानंतर अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, चिली मेक्सीको व न्यूझिलंड या देशांमध्ये याला लाँच करण्यात आले. यानंतर आजपासून हे फिचर १७ युरोपीयन राष्ट्रांमध्ये देण्यात आले आहे. तर कोणत्याही क्षणाला ही सुविधा भारतीय युजर्सलाही मिळू शकते.
फेसबुक मार्केटप्लेसवर कुणीही युजर आपल्याला हव्या त्या वस्तूच्या विक्रीसाठी लिस्टींग करू शकतो. तर अन्य युजर्सला त्याच्या परिसरात (निअरबाय) कोणता व्यक्ती काय विकतोय ? याची माहिती मिळू शकते. यासाठी फेसबुक संकेतस्थळासह याच्या अँड्रॉइड व आयओएस अॅपमध्ये स्वतंत्र टॅब (विभाग) प्रदान करण्यात आला आहे. यावर क्लिक केल्यावर कुणालाही युजर्सच्या लिस्टींग दिसू शकतात. या माध्यमातून होणार्या विक्री वा खरेदीवर कोणतीही आकारणी करण्यात येत नाही. अर्थात ही सुविधा अगदी मोफत उपलब्ध आहे. मोफत क्लासीफाईड या प्रकारची ही सुविधा आहे. अर्थात फेसबुक साईटने या माध्यमातून ओएलएक्स, क्विकर वा क्रेगलिस्ट या संकेतस्थळांना जोरदार धक्का देण्याची तयारी सुरू केल्याचे यातून स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे. आणि फेसबुक या संकेतस्थळाची अजस्त्र युजर्स संख्या पाहता या कंपन्या नक्कीच धास्तावल्या असतील.