नवी दिल्ली-
फेसबुक हे जगात सर्वात मोठं आणि सर्वाधिक वापरलं जाणारं सोशल मीडिया व्यासपीठ आहे. वापरकर्त्यांना नव्या सुविधा देण्यासाठी आणि त्यांचा अनुभव आणखी समृद्ध करण्याच्या उद्देशातून फेसबुककडून नवे बदल केले जातात. याच संदर्भातील एक मोठा बदल फेसबुककडून केला जाणार आहे. फेसबुकवर भारतीय युझर्सची संख्या कोट्यवधींची घरात आहे. भारतीय युझर्ससाठी फेसबुककडून इंटरफेसमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. यात फेसबुक पेजवरुन आता Like बटण काढून टाकण्यात येणार आहे. तर एखाद्या पेजच्या फॉलोअर्सवर लक्ष केंद्रीत करणंही कमी केलं जाणार आहे. फेसबुक पेजचं हे नवं डिझाइन यावर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच जानेवारी महिन्यात लाँच करण्यात आलं होतं. हे नवं व्हर्जन आता भारतात अधिकृतरित्या लाँच केलं जात आहे.
कसं दिसणार फेसबुक?फेसबुक पेजचं नवं डिझाइन आणि युझर इंटरफेसनुसार पेजची मांडणी अत्यंत साधी आणि सोपी असणार आहे. यात एक डेडिकेटेड न्यूज फीड सेक्शन देखील असणार आहे. यात युझर्सना कमेंट्स, संवाद आणि आपल्या प्रशंसकांशी जोडता येण्याची सुविधा असणार आहे.
फेसबुकनं काय म्हटलं?"फेसबुकच्या नव्या इंटरफेसमुळे वापरकर्त्यांना ट्रेंड फॉलो करणं, फ्रेंड्ससोबत संवाद साधणं आणि प्रशंसकांशी जोडलं जाणं अतिशय सोपं होणार आहे. न्यूज फीडसाठी स्वतंत्र पर्याय तसेच अन्य सेलिब्रिटी, पेजेस, ग्रूप्स आणि ट्रेंडिंग कंन्टेंटसारखे पर्याय वापरकर्त्यांना सुचवले जातील असं नवं डिझाइन असणार आहे", असं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे.
नवं डिझाइन असणार अधिक सुरक्षितफेसबुक पेजचं नवं डिझाइन आधीपेक्षी अधिक सुरक्षित असणार असल्याचा दावा फेसबुकनं केला आहे. यात द्वेष (Hate Speech), हिंसा, लैंगिक शोषण इत्यादी आक्षेपार्ह माहितींचा शोध घेण्यास अधिक सक्षम असणार आहे. याशिवाय वापरकर्त्यांना मिळणारी माहिती सुयोग्य आणि खोटी नाही याची अधिक खात्री पटावी यासाठी पेजवर व्हेरिफाइड बॅचची दृश्यता देखील वाढविण्यात येणार आहे. म्हणजेच व्हेरिफाइडचं टिकमार्क अधिक बोल्ड करण्यात येणार आहे.