वॉशिंग्टन :फेसबुकवर आपण दिवसाचा बराच वेळ वाया घालवतो. मात्र, फेसबुकवर अमेरिकन कायद्यात हा बदल झाल्यास हाच वेळ आपल्यासाठी कमाईचे साधन बनू शकणार आहे. फेसबुकवर आपल्याला दाखविल्या जाणाऱ्या जाहिरातींतून पैसे कमविता येणार आहेत. कसे ते जाणून घेऊयात...
फेसबुकचा जगभरात महिन्याकाठी सव्वादोन अब्ज एवढा प्रचंड युजर बेस आहे. या युजरना फेसबुक त्यांच्या आवडीप्रमाणे जाहिराती दाखिवते. या जाहिराती त्या ब्रँडच्या पसंतीनुसार आणि त्यांनी मोजलेल्या पैशांनुसारही दाखविल्या जातात. म्हणजेच जाहिराती दाखविण्याचे प्रमाण कंपनीने मोजलेल्या किंमतीनुसार असते. आपण ज्या जाहिराती पाहतो त्याचा एक छदामही आपल्याला मिळत नाही.
जाहिरातींच्या माध्यमातून फेसबुकही अब्जावधी डॉलर कमावते. यामुळे हा प्रकार फेसबुकला कंटेंट क्रिएटर या व्यवसाय प्रकारमध्ये घेऊन जातो. यामुळे फेसबुकला पब्लिशर म्हणून घोषित करावे, असा दावा अमेरिकी न्यायालयामध्ये फेसबुकच्या जाहिरातींसंबंधी सुरु असलेल्या एका खटल्यावेळी वकिलांनी केला आहे.
एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या लेखामध्ये यासंबंधीचा उल्लेख करण्यात आला आहे. जर फेसबुकला कंटेंट क्रिएटर असल्याचे घोषित केले गेल्यास फेसबुकवर युजरकडून लिहिल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर पैसे द्यावे लागणार आहेत. म्हणजेच युजर आणि प्रकाशक फेसबुककडे पैसे मागू शकणार आहेत. यानुसार फेसबुकवर मोफत लिहिणाऱ्या युजरना कमाईचे साधन मिळणार आहे.
फेसबुकही एक प्रकाशकच !न्युयॉर्कच्या एका न्यायालयामध्ये हा खटला सुरु आहे. वकिलांचा असा दावा आहे की, जाहिरातदारांसाठी फेसबुक त्याच्या वापरकर्त्यांच्या माहितीचे व्यवस्तापन करते. यामुळे फेसबुकही माहितीचे निर्माण करुन त्याद्वारे पैसे कमविणाऱ्या अन्य मिडिया संस्थांसारखेच आहे. यामुळे कायद्यानुसार फेसबुकला कंटेंट क्रिएटरच मानले जावे.