नवी दिल्ली - फेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. फेसबुक हे लोकप्रिय मेसेजिंग अॅप आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. फेसबुक लवकरच आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन सर्व्हिस सुरू करणार आहे. युजर्सना आता फेसबुकवर नवा न्यूज सेक्शन मिळणार आहे. या न्यूज सेक्शनच्या माध्यमातून जगाभरातील सर्व बातम्या या युजर्सना पाहायला मिळणार आहेत. काही दिवसांपूर्वी फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुकमध्ये लवकरच एक न्यूज टॅबचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती.
न्यूज सेक्शन या नव्या सर्व्हिससाठी फेसबुक न्यूज प्रोव्हाईड करणाऱ्या वेबसाईट आणि एजन्सीसोबत चर्चा करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फेसबुकने आपल्या प्लॅटफॉर्मवरून न्यूज सेक्शन सुरू करण्यासाठी प्रमुख मीडिया हाऊसशी चर्चा सुरू केली आहे. यामध्ये न्यूयॉर्क पोस्ट, वॉशिंग्टन पोस्ट, समाचार कॉर्प सारख्या मीडिया हाऊस आणि पब्लिकेशन्स आहेत. मात्र फेसबुकने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
फेसबुक युजर्सना फोटो आणि पोस्टना मिळालेले लाईक्स दिसणार नाहीत. फेसबुक एका नव्या फीचरवर काम करत असून यामध्ये युजर्स आपल्या पोस्ट आणि फोटोवरील लाईक्स हाईड करू शकतात. फेसबुकच्या या नव्या फीचरमध्ये सेटिंग बदल केल्यानंतर लाईक्स आणि रिअॅक्शन हे फक्त ज्या व्यक्तीने ती पोस्ट केली आहे त्यांनाच दिसणार आहेत. इन्स्टाग्रामवरही या फीचरचं टेस्टिंग घेण्यात आलं आहे. टेक क्रंचने दिलेल्या रिपोर्टनुसार, फेसबुक लाईक काऊंट हाईड करण्याचं हे फीचर सर्वप्रथम ऑस्ट्रेलियामध्ये देण्यात येणार आहे.
फेसबुकवर पोस्ट अथवा फोटोला कमी लाईक्स मिळाले की अनेकजण निराश होतात. मात्र आता या नव्या फीचरमुळे अनेकांना फायदा होणार आहे. तसेच कमी लाईक्स मिळतात म्हणून अनेक लोक फेसबुकवर पोस्ट करायला घाबरतात किंवा केलेली पोस्ट काही वेळाने डिलीट करत असल्याची माहिती एका रिसर्चमधून समोर आली आहे. त्यामुळेच फेसबुकने पोस्ट आणि फोटोवरील लाईक्स हाईड करण्याचा विचार केला आहे.
फेसबुक युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण फेसबुकने भारतात आपले म्युझिक प्रोडक्ट्स लॉन्च केले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, म्युझिक प्रोडक्ट्सच्या मदतीने युजर्स गाण्याच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करू शकतात. तसेच फेसबुक प्रोफाईल आणि स्टोरीमध्येही यामुळे आवडतं गाणं ऐकवता येणार आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये म्युझिक स्टिकर, लिरिक्स, लिप सिंक लाईव्ह सारख्या सुविधा देण्यात येणार आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने दिलेल्या माहितीनुसार, नव्या प्रोडक्ट्सच्या मदतीने युजर्स बॉलिवूडची लोकप्रिय गाणी फेसबुक आणि इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये वापरू शकतात. फेसबुकचं हे प्रोडक्ट 55 देशांमध्ये उपलब्ध आहे. फेसबुक इंडियाचे डायरेक्टर आणि पार्टनरशिप हेड मनीष यांनी दिलेल्या माहितीनुसार, युजर्सना प्लॅटफॉर्मवर गाण्यांच्या माध्यमातून अनेकांशी कनेक्ट होता येईल तसेच आपल्या भावना व्यक्त करता येतील हा कंपनीचा यामागे उद्देश आहे.