फेसबुकने एक वर्षापूर्वी वर्कप्लेस हे चॅट अॅप लाँच केले होते. प्रयोगात्मक अवस्थेत असतांना याला फेसबुक अॅट वर्क असे नाव होते. तथापि, याला नंतर फेसबुक वर्कप्लेस हे नाव देण्यात आले. वर्षानंतर भारतासह जगातील तब्बल ३० हजारांपेक्षा जास्त कंपन्या याचा वापर करत असल्याची अधिकृत माहिती फेसबुकतर्फे जाहीर करण्यात आली आहे. आजवर ही सुविधा फक्त अँड्रॉइड आणि आयओएस या दोन प्रणालींसाठीच सादर करण्यात आली होती. मात्र आता फेसबुक वर्कप्लेस हे संगणकासाठीही उपलब्ध करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थात आता कुणीही आपल्या डेस्कटॉपवरून याचा वापर करू शकेल. याशिवाय यात काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये स्क्रीन शेअरिंग, ग्रुप व्हिडीओ चॅटींग आणि फाईल शेअरिंगची सुविधा देण्यात आली आहे.
काय आहे फेसबुक वर्कप्लेस ?जगभरातील बहुतांश कंपन्या आपले कर्मचारी हे फेसबुकवर वेळ वाया घालवतात म्हणून चिंताग्रस्त झालेल्या आहेत. यामुळे कंपनी व्यवस्थापनासाठी फेसबुक ही एक प्रकारची डोकेदुखी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर फेसबुकने खास कंपन्यांसाठी फेसबुक वर्कप्लेस ही सेवा सुरू केली आहे. यात सोशल नेटवर्कींगला कार्पोरेट संवादाची जोड देण्यात आली आहे. यात कोणतीही कंपनी वा प्रतिष्ठान आपल्या कर्मचार्यांसाठी खास ग्रुप तयार करू शकतात. या माध्यमातून ते आपापल्या कामाशी संबंधीत बाबींना एकमेकांसोबत शेअर करू शकतात. यात इन्स्टंट मॅसेंजर, व्हिडीओ चॅटींग, लाईव्ह स्ट्रीमिंग आदी फिचर्सदेखील देण्यात आले आहेत. एखाद्या कंपनीचे कर्मचारी याला अंतर्गत कम्युनिकेशनसाठी वापरू शकतात. तर याच्या माध्यमातून दुसर्या कंपनीशी संपर्काची सुविधादेखील आहे. विशेष म्हणजे यातील सर्व माहिती ही अत्यंत सुरक्षित असल्याची ग्वाही फेसबुकतर्फे देण्यात आली आहे. एका अर्थाने कोणत्याही कंपनीला या माध्यमातून आपल्या कर्मचार्यांसाठी कस्टमाईज्ड सोशल नेटवर्क उभारण्याची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय न्यूज फिडसह यात फेसबुकचे अन्य नियमित फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत.