ई-मार्केटर या संस्थेने नुकत्याच सोशल मीडियासंदर्भात केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष एका अहवालाच्या स्वरूपात जाहीर केले आहेत. यात प्रामुख्याने अमेरिका आणि ब्रिटनमधील १३ ते १७ वर्षे वयोगटातील युजर्समध्ये फेसबुकची लोकप्रियता कमी होत असल्याचे दिसून आले आहे. या वयोगटातील मुले फेसबुकवर तुलनेत कमी प्रमाणात लॉग इन करतात. अथवा लॉग इन केले तरी कमी प्रमाणात वेळ यावर व्यतीत करतात. एवढेच नव्हे तर फेसबुक नेव्हर्स या नावाचा एक नवीन वर्गदेखील उदयास आला असून तो या सोशल नेटवर्कींग साईटवर कधीही लॉग इन करत नसून ही बाब मोठ्या अभिमानाने मिरवतो. गेल्या वर्षभरात या गटाचा विचार करता अमेरिकेत ३.४ तर ब्रिटनमध्ये २.८ टक्के युजर्सने फेसबुकचा वापर सोडल्याचे दिसून आले आहे. आज ही टक्केवारी कमी वाटत असली तरी ती फेसबुकसाठी आत्मचिंतन करायला भाग पाडणारी आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे याच्या पुढील अर्थात १८ ते २४ या वयोगटातही हाच ट्रेंड येऊ घातला असून ब्रिटनमध्ये या वर्गवारीत ३.४ टक्के घट होणार असल्याची शक्यता या अहवालात वर्तविण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अन्य राष्ट्रांमध्येही हाच ‘ट्रेंड’ राहण्याची शक्यता आहे.
फेसबुकपासून दूर जाणारी तरूणाई स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामला मोठ्या प्रमाणात पसंती देत असल्याचे ई-मार्केटरच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यात शब्दांपेक्षा व्हिज्युअल कंटेंट मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. अर्थात प्रतिमा, इमोजी, जीआयएफ अॅनिमेशन्स, स्टीकर्स, विविध आकर्षक फिल्टर्स, व्हिडीओज आदींचा मुक्त वापर तरूणाई करू लागली आहे. खरं तर फेसबुकने काळाची पावले ओळखत आपल्या युजर्ससाठीदेखील या प्रकारचे फिचर्स प्रदान केले आहेत. विशेष करून स्नॅपचॅटच्या अनेक फिचर्सची याचसाठी फेसबुकने कॉपी केल्याचे मानले जात आहे. असे असले तरी याकडे तरूणाई पाठ फिरवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील दिलासादायक बाब म्हणजे इन्स्टाग्रामची मालकी फेसबुककडेच आहे. तथापि, तब्बल २०० कोटींपेक्षा जास्त युजर्स असणार्या फेसबुकला आता टिनएजर्स ग्रुपला आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्रकारांचा अवलंब करावा लागेल हे मात्र नक्की.