वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून फेसबुक आणि फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपविरोधात युझर्सची तीव्र नाराजी असतानाही चौथ्या तिमाहीत फेसबुकने तब्बल ११.२२ अब्ज डॉलरची कमाई केल्याची माहिती मिळाली आहे.
फेसबुकने चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत प्रचंड नफा कमावला आहे. कोरोना संकटामुळे काही महिने जागतिक व्यवहार ठप्प झाले होते. अशातच कोट्यवधी युझर्सनी सोशल मीडियावर सर्वाधिक वेळ घालवला. या कोरोना संकटाचा फेसबुकला फायदाच झाला. डिजिटल जाहिरातींच्या माध्यमातून फेसबुकने अब्जावधी डॉलर्सची उलाढाल केली आहे.
सन २०२१ आव्हानात्मक
चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत नफा कमावला असला, तरी आगामी सन २०२१ च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनी किती पैसे कमावेल याबाबत सध्या तरी अनिश्चितता आहे, असा अंदाज फेसबुककडून व्यक्त करण्यात आला आहे. आगामी कालावधीत फेसबुकला आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
तब्बल ११.२२ अब्ज डॉलर्सचा नफा
फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीमुळे कंपनीला काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. जगभरातील युझर्स व्हॉट्सअॅपवर नाराज आहेत. मात्र, चौथ्या तिमाहीतील उलाढालीचा आकडा पाहून या विरोधााचा कंपनीवर फारसा परिणाम झालेला पाहायला मिळाला नाही. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये तब्बल ११.२२ अब्ज डॉलर्स नफा फेसबुकने कमावला आहे. ही कमाई २०१९ च्या शेवटच्या तिमाहीमधील कमाईपेक्षा ५३ टक्क्यांनी जास्त आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनीच्या कमाईत २२ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच फेसबुकची मासिक वापरकर्त्यांची संख्या १२ टक्क्यांनी वाढून २.८ अब्ज इतकी झाला आहे, असे सांगितले जात आहे.