ऑनलाईन व्हिडीओ शेअरिंगमध्ये फेसबुकने आता युट्युब या संकेतस्थळाच्या तोंडाला फेस आणण्याची तयारी सुरू केली असून एका नवीन फिचरच्या माध्यमातून याची चुणूक दिसून येत आहे.
सध्याचे युग व्हिडीओचे असल्याबद्दल कुणाचे दुमत असू शकत नाही. सोशल साईटस् आणि मॅसेंजर हे व्हिडीओजनी ओसंडून वाहत आहेत. खरं तर व्हिडीओ म्हटल्यानंतर युट्युब हे नाव आपोआप समोर येते. कारण व्हिडीओ शेअरिंगच्या क्षेत्रात या संकेतस्थळाने मानवी इतिहासाला दिलेले नवीन वळण कुणी नाकारणार नाही. आजही व्हिडीओ अपलोड, शेअर आणि व्ह्यूज आदींमध्ये युट्युब अव्वल स्थानी आहे. यात व्हिडीओ अपलोड करण्यापासून ते याच्या व्यावसायिक वापराबाबत (जाहिराती) एक अतिशय पारदर्शक आणि सुलभ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र फेसबुकने गेल्या काही वर्षांपासून युट्युब साईटला आव्हान देण्यासाठी नियोजनबध्द पावले उचलली आहेत. या अनुषंगाने आता या ताज्या फिचरच्या माध्यमातून युट्युब साईटला दणका देण्याची तयारी केली आहे.
( फेसबुक लवकरच टिव्ही शो सुरू करणार असल्याचे वृत्त आधीच लोकमतवर प्रकाशित करण्यात आले असून आपण ते http://www.lokmat.com/tech/soon-you-will-watch-tv-serials-facebook या लिंकवर वाचू शकतात. )
फेसबुकने आता आपल्या युजर्ससाठी वॉच हा स्वतंत्र विभाग दिला असून यात विविध टिव्ही शोजची वर्गवारीनुसार लिस्टींग करण्यात येणार आहे. यात दूरचित्रवाणी कार्यक्रम, विविध मनोरंजनपर शोज, कला-क्रीडा-संस्कृती-चालू घडामोडी आदींशी संबंधीत व्हिडीओ असतील. यात लाईव्ह व रेकॉर्डेड या दोन्ही प्रकारांचा समावेश असेल. फेसबुकवर व्हायरल होणार्या व्हिडीओजच्या विश्वासार्हतेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येते. मात्र वॉच या विभागात मान्यताप्राप्त मीडिया संस्थाने आणि मनोरंजन कंपन्यांचे कार्यक्रम असल्याने विश्वासार्हतेची गॅरंटी असेल. फेसबुकने काही महिन्यांपासूनच युट्युब साईटप्रमाणे व्हिडीओजच्या प्रारंभी आणि मध्ये जाहिराती दाखविण्याची चाचपणी सुरू केली असून नव्या फिचरमध्ये याचा अंतर्भाव असण्याची शक्यता आहे. म्हणजेच कंटेंट आणि त्याचे व्यवसायीकरण या दोन्ही प्रकारांमध्ये फेसबुक आता युट्युब संकेतस्थळाला आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे नवीन फिचरच्या माध्यमातून फेसबुक व्हिडीओ ऑन डिमांड/स्ट्रीमिंग या क्षेत्रातही पदार्पण करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
फेसबुकचे तब्बल २०० कोटींपेक्षा जास्त युजर्स असून हा आकडा युट्युबच्या १५० कोटी युजर्सपेक्षा जास्त आहे. यामुळे नवीन सेवेच्या माध्यमातून युट्युब आणि अन्य संकेतस्थळांना धक्का देण्याची तयारी फेसबुकने केल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. यातील पहिल्या टप्प्यात फेसबुकने फक्त युट्युब साईटलाच टार्गेट केले असले तरी पुढील टप्प्यात अन्य सेवा लक्ष्य असेल असे मानले जात आहे.