नवी दिल्ली - फेसबुक या सोशल नेटवर्कींग साईटवरील ट्रेंडींग टॉपिक हा विभाग बंद करण्यात येणार असून कंपनीला याला दुजोरा दिला आहे. फेसबुकवर युजर्ससाठी ट्रेंडींग टॉपीक हा स्वतंत्र विभाग देण्यात आला आहे. डेस्कटॉप आवृत्तीत याला आपण उजव्या बाजूस असणार्या साईडबारमध्ये पाहू शकतो. यात त्या क्षणाला जगभरात नेमके काय घडत आहे? याच्याशी संबंधीत वृत्तांना दिलेले असते. यात टॉप ट्रेंडसह राजकारण, क्रीडा, मनोरंजन तसेच विज्ञान-तंत्रज्ञान आदींसाठी स्वतंत्र विभाग देण्यात आलेले आहेत. यावर क्लिक केल्यावर आपण त्या-त्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी एकाखाली एक या प्रकारात पाहू शकतो. यात हव्या असणार्या लिंकवर आपण क्लिक करून त्याला वाचू शकतो. गेल्या सुमारे चार वर्षांपासून फेसबुकच्या युजर्सला ट्रेंडींग टॉपीकची सुविधा देण्यात आलेली आहे. आता मात्र हा विभाग बंद करण्यात येणार असून याला ब्रेकींग न्यूज या नावाने नव्याने सादर करण्यात येणार आहे.
फेसबुकच्या ट्रेंडींग टॉपीक या विभागात आधी या कंपनीच्या कर्मचार्यांनी संपादीत केलेल्या वृत्ताच्या लिंक देण्यात येत होत्या. मात्र यात अमेरिकेतील परंपरावादी विचारधारेच्या वृत्तांना कात्री लावण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे अलॉगरिदमच्या मदतीने याला निवडण्यात येऊ लागले. मात्र यामुळे अनेक फेकन्यूजदेखील ट्रेंडींग टॉपीक या विभागात दिसू लागल्याने वाद सुरू झाले आहेत. यामुळे हा विभाग आता ब्रेकींग न्यूज या नावासह नव्याने सादर करण्यात येणार आहे.