Fake Elon Musk Love: आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. हे तंत्रज्ञान जगात आल्यापासून अनेक गोष्टी सोयीस्कर झाल्या आहेत. पण तेव्हापासून डीपफेकचा वापर देखील मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे, ज्यामुळे जगभरातील युजर्सचे नुकसान होत आहे. डीपफेकचा वापर करून हॅकर्स युजर्सची वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक करत आहेत. अशातच दक्षिण कोरियातून एक नवीन घटना समोर आली आहे. खरे तर एक महिला इलॉन मस्क यांच्या डीपफेक म्हणजेच बनावट मस्क यांच्या प्रेमात पडली. यामुळे संबंधित महिलेला सुमारे ४१ लाख रूपयांचे नुकसान झाले. (Deepfake Scam)
एका ब्रॉडकास्टरला माहिती देताना दक्षिण कोरियातील जियोंग जी-सन या महिलेने सांगितले की, १७ जुलै २०२३ रोजी बनावट मस्क अकांउटवरून माझी फसवणूक केली. इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली. इलॉन मस्क यांची बायोग्राफी वाचून मी त्यांची खूप मोठी फॅन झाले आहे. पंरतु इंस्टाग्रामवर जोडल्यानंतर मला प्रथम संशय आला. पण त्यानंतर बनावट मस्कने मला त्याचे फोटो पाठवले, आयडी पाठवली. ऑफिसमधील काही फोटो शेअर केले. तो सतत ऑफिसमधील बाबी आणि त्यांच्या मुलांबद्दल गोष्टी सांगत होता. तसेच तो टेस्लाशी संबंधित मुद्द्यांवर भाष्य करत होता.
जियोंग जी-सनने आणखी सांगितले की, माझा विश्वास पटला तेव्हा अचानक बनावट मस्क याचा व्हिडीओ कॉल आला. बनावट मस्क हुबेहुब इलॉन मस्क यांच्यासारखा दिसत होता. त्यानंतर त्याने मला प्रपोज केले आणि मग आम्ही बोलू लागलो. काही दिवसांनी त्याने मला विश्वासात घेत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. जेणेकरून मी देखील मस्क यांच्यासारखी श्रीमंत व्यक्ती बनू शकेन. मग बनावट मस्कने महिलेला कोरियन बँक खात्याचे तपशील पाठवले. बनावट मस्कने महिलेला सांगितले की हे खाते त्याच्या कंपनीच्या कोरियन कर्मचाऱ्याचे आहे, ज्यामध्ये ७० मिलियन कोरियन वॉन (४१ लाख रुपये) गुंतवायचे होते. बनावट मस्कने महिलेला सांगितले की या पैशाने तो तिला श्रीमंत करेल. यानंतरही त्याने काही पैसे उकळून महिलेचे मोठे नुकसान केले.