मुंबई : गेल्या अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बहुचर्चित FAU-G हा गेम भारतात लॉन्च करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी लॉन्च करण्यात आलेला हा गेम आता गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे लॉन्च होताच या गेमने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. अवघ्या २४ तासांत गुगल प्ले स्टोरवरून तब्बल १० लाख जणांनी हा गेम डाऊनलोड केला आहे.
भारतात PUBG गेमवर बंदी घातल्यानंतर FAU-G गेमची घोषणा करण्यात आली होती. युझर्समध्ये या गेमबाबत मोठी क्रेझ होती. FAU-G गेमची ही क्रेझ लाँचिंगनंतर समोर आलेल्या डाऊनलोड्सच्या आकडेवारीवरुन पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. nCore गेमिंग नावाच्या एका भारतीय कंपनीने हा गेम डेव्हलप केला असून अभिनेता अक्षय कुमार गेमला प्रमोट करत आहे.
सध्या FAU-G एकाच मोडवर
आताच्या घडीला हा गेम केवळ एकाच मोडवर खेळता येणार आहे. संपूर्ण गेमचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागेल. आता या गेममध्ये कॅम्पेन मोड उपलब्ध आहे. या मोडमध्ये भारतीय सैन्यदलाचा एक अधिकारी त्याच्या टीमपासून वेगळा झाला आहे आणि त्याला शोधण्यासाठी बाकीचे अधिकारी आणि जवान मिशनवर जाणार आहेत.
iOS अद्याप उपलब्ध नाही
तुमच्या स्मार्टफोनवर हा गेम खेळायचा असेल तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये किमान ४६० एमबी स्पेस असायला हवी. तसेच तुम्हांला या गेमच्या सर्व्हरमध्ये साईन इन करण्यासाठी मोबाइल किंवा वायफाय कनेक्शन/नेटवर्कची आवश्यकता भासेल. FAU-G हा गेम केवळ गुगल प्ले स्टोरवरच उपलब्ध आहे. त्यामुळे iOS युझर्सना या गेमसाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. iOS युझर्ससाठी हा गेम उपलब्ध होणार आहे किंवा नाही किंवा तो कधी उपलब्ध होईल, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.