गुगलच्या कर्मचाऱ्यांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार लटकू लागली आहे. मिनिटा मिनिटाला करोडो रुपये कमावणाऱ्या गुगल सारख्या कंपनीला जागतिक मंदीचा फटका बसू लागला आहे. यामुळे सुंदर पिचईंनी गुगलच्या कर्मचाऱ्यांना चालू तिमाहित चांगले प्रदर्शन न झाल्यास कर्मचारी कपात करण्यापासून पर्याय राहणार नाही, असा इशाराच दिला आहे.
न्यूयॉर्क पोस्टने गुगल क्लाउडच्या विक्री विभागातील एका कर्मचाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, तिमाहीचा निकाल खराब आल्यास कंपनी कठोर पावले उचलणार आहे. Google ची मूळ कंपनी अल्फाबेटने 2022 च्या उर्वरित काळासाठी नवीन कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया हळू करण्याचा निर्णय गेल्या महिन्यात घेतला आहे.
इनसाइडर वेबसाईटला गुगलच्या काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की, कर्मचारी कपातीचा इशारा आल्यानंतर गुगलचे कर्मचारी धास्तावले आहेत. त्यांना कामावरून कमी केले जाण्याची भीती वाटू लागली आहे. गेल्या तिमाहीत गुगलच्या महसुलातील वाढ दोन वर्षांतील सर्वात कमी होती. टेक कंपन्या दीर्घकाळापासून आव्हानांचा सामना करत आहेत आणि म्हणूनच या वर्षीचा नॅसडॅक कंपोझिट इंडेक्स 26 टक्क्यांनी घसरला आहे.
कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 10,000 नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली असली तरी, वर्षाच्या पुढील काही दिवसांसाठी, कंपनी केवळ अभियांत्रिकी आणि तांत्रिक विभागांसाठी कर्मचारी भरती करणार आहे, असे पिचईंनी गेल्याच महिन्यात म्हटले होते. पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले होते की, आर्थिक मंदीपासून गुगलही वेगळी राहू शकत नाही. इतर कंपन्यांप्रमाणे आम्हीही आर्थिक संकटांचा सामना करत आहोत. आपण अनिश्चित जागतिक आर्थिक परिस्थितीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. सध्याच्या परिस्थितीचे संधींमध्ये रूपांतर करू.