Twitter News: मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने आज एक मोठी घोषणा केली आहे. युजर अनेक दिवसांपासून ज्या फीचरची वाटत पाहत होते, ते एडीट ट्विट फीचर लवकरच मिळणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत हँडलवरून याबाबत माहिती दिली. कंपनीने म्हटले की, 'आम्ही एडिट बटणावर काम करत आहोत. तुम्हाला तुमच्या हँडलवर एडिट ट्विटचा पर्याय दिसला तर समजून जा की टेस्टिंग सुरू आहे.'
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, ट्विटर पहिल्यांदाच आपल्या एडिट बटणावर काम करत आहे. ट्विटरवर एडिट बटणाबाबत अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. एडिट बटणावर कंपनीत आणि बाहेरही चर्चा सुरू होती की हा योग्य निर्णय असेल की नाही? पण आता ट्विटरने स्वतः या फीचरवर काम करत असल्याची माहिती आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे.
आधी प्रीमियम ग्राहकांना मिळणार ?कंपनीच्या ट्विटनुसार, काही अकाऊंटमध्ये एडिट बटण दिसू लागले आहे. पण, हे फीचर सध्या टेस्टिंग मोडमध्ये आहे. कंपनी सर्व युजर्सना हे फीचर लागू करण्याबाबत टेस्टिंग करत आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, एडिट बटण लवकरच $ 4.99 प्रति महिना दराने ट्विटर ब्लूच्या सदस्यांना मिळेल.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, ट्विटर सध्या फक्त 30 मिनिटांसाठी हे फीचर जारी करत आहे. म्हणजेच ट्विट केल्यानंतर 30 मिनिटांपर्यंत ट्विट एडीट केले जाऊ शकते. पण, हे फीचर सर्व युजर्सना मिळणार की, फक्त प्रीमियम ग्राहकांना मिळणार, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.