गेल्या दीड वर्षापासून सुरु असलेल्या 5G येणार असल्याच्या चर्चांना आता पुर्णविराम मिळणार आहे. कारण त्या दिशेने आज पहिले पाऊल पडणार आहे. आज 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. या लिलावात देशातील तीन खासगी टेलिकॉम कंपन्या आणि अदानींची एक कंपनी अशा चार जणांनी सहभाग घेतला आहे. या लिलावात जिओ, व्होडाफोन आणि एअरटेलसह गौतम अदानींची Adani Data Networks बोली लावणार आहेत. यामध्ये खरी लढाई अदानी आणि अंबानींमध्ये होण्याची शक्यता आहे. सध्यातरी स्पर्धा नसली तरी भविष्यात या दोन्ही कंपन्या एकमेकांशी स्पर्धा करण्याची शक्यता आहे.
72 GHz स्पेक्ट्रमचा लिलाव 4.3 लाख कोटी रुपयांवर सुरु होणार आहे. त्याची वैधता 20 वर्षे असेल. लिलावात यशस्वी ठरलेली कंपनी याद्वारे 5G सेवा देऊ शकणार आहे. विविध स्तरावरील बँड विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. विविध कमी वारंवारता बँड (600 MHz, 700 MHz, 800 MHz, 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 2300 MHz), मध्यम (3300 MHz) आणि उच्च वारंवारता बँड (2GHz) मध्ये रेडिओ लहरींसाठी लिलाव आयोजित करण्यात आला आहे.
देशात पुढील काही महिन्यांत ५जी सेवा लाँच होणार आहे. मुंबई, पुणे, दिल्लीसह दहा शहरांमध्ये सुरुवातीला ही सेवा सुरु केली जाईल. या सुपरफास्ट सेवेचा सामान्यांच्या दैनंदिन जीवनात काय फायदा होईल हे ही सेवा प्रत्यक्षात आल्यावरच समोर येणार आहे. पण 5G नंतर बरेच काही बदलणार आहे.
2000 च्या दशकात, बहुतेक लोक 2G किंवा 3G नेटवर्क वापरत होते. भारतात 4G च्या प्रवेशानंतर इंटरनेट स्पीडने मोठी क्रांती घडविली. व्हिडीओंच्या बाबतीत मोठी क्रांती झाली. व्हिडीओ पाहणे, व्हिडीओ कॉल करणे सोपे झाले. त्याचप्रमाणे 5G नेटवर्क आल्यानंतर आपल्याला अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळतील. 4G नेटवर्कवर आपल्याला 100Mbps पर्यंत वेग मिळतो, परंतु 5G वर तो Gbps मध्ये उपलब्ध असेल.
5G नेटवर्क आणण्यासाठी आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागेल. मोठ्या शहरांमध्ये हे तंत्रज्ञान लवकरच उपलब्ध होणार आहे. पण गावे आणि छोट्या शहरांना अजून थोडी वाट पहावी लागणार आहे.