काही महिन्यांतच मोबाईलचे तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. अवघ्या 2 महिन्यांपूर्वी 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेले फोन बाजारात आलेले असताना आता 64 मेगापिक्सलचा कॅमेरावाला फोन येऊ घातला आहे. यामुळे 48 मेगापिक्सलचा फोन घेणाऱ्यांचा हिरमोड होणार हे नक्की.
सध्या सर्वत्र सोनीचा 48 मेगापिक्सलच्या सेन्सरची चर्चा आहे. वनप्लसनंतर शाओमीने दोन फोन लाँच केले आहेत. तर गुगलचा पाठिंबा असलेल्या मोटरोलानेही नुकताच 48 मेगापिक्सलच्या सेन्सरचा फोन कमी किंमतीत लाँच केला आहे. मात्र, या कॅमेऱ्याला टक्कर सोडाच त्याच्याही पुढचा असलेला फोन रिअलमी लाँच करणार आहे. तेही पहिल्यांदा भारतात.
काही दिवसांपूर्वी Realme Mobilesचे भारतातली सीईओ माधव सेठ यांनी ही माहिती दिली होती. त्यांनी त्यांच्या ट्विटरवर एक फोटो शेअर केला असून हा एकदम झक्कास फोटो Samsung GW1 च्या 64 मेगापिक्सलच्या सेन्सरने घेतल्याचा दावा केला आहे. हा फोटो लँडस्केप मोडवर घेण्यात आला आहे. तसेच या सेन्सरचा पहिला वहिला फोन भारतात लाँच केला जाणार असल्याचे सेठ यांनी म्हटले आहे.
सॅमसंगने सोनीच्या 48 मेगापिक्सल कॅमेराचे फोन लाँच झाल्यानंतर लगेचच या 64 मेगापिक्सलच्या कॅमेराची घोषणा केली होती. तसेच आजपर्यंतचा उच्चतम रिझोल्युशनचा सेन्सर असल्याचे म्हटले होते. या सेन्सरमध्ये 1.6 मायक्रॉन पिक्सल आहेत. 1/1.72 इंचाच्या सेन्सर आणि कमी पिक्सलमुळे हा फोन अंधारातही चांगले फोटो खेचण्याची क्षमता ठेवतो. हा सेन्सर सॅमसंगच्या टेट्रासेल प्रणालीवर काम करतो. हा सेन्सर 100 db पर्यंत रिअल टाईम HDR चे फोटो काढू शकतो. याशिवाय सेन्सरमधून 1080p स्लो- मोशन व्हिडीओही घेता येतो.
हा रिअलमीचा फोन येत्या 8 ऑगस्टला भारतात लाँच केला जाणार आहे. रिअलमीचे ड्युअल कॅमेरा असलेले फोन बाजारात आहेत. हा फोन क्वाड म्हणजेच चार कॅमेरे असलेला असण्याची शक्यता आहे. 64 मेगा पिक्सलच्या वाईड अँगल सेन्सरसोबत टेलिफोटो लेन्सही देण्याची शक्यता आहे. या फोनची किंमतही 20 हजारांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.