ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अनेकवेळा असे दिसून आले आहे की, युझरच्या आधारकार्डवर एकपेक्षा जास्त मोबाईल क्रमांक सुरू असतात, ज्याबद्दल त्यांना माहिती नसते. त्या क्रमांकावरून कोणताही गुन्हा घडल्यास त्या व्यक्तीला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.
या संदर्भात, दूरसंचार विभागाने काही काळापूर्वी एक पोर्टल सुरू केले होते. ज्यावरून एका आधारावर किती सिम जारी केले आहेत, हे कळू शकते. याशिवाय, तुम्ही तुमच्या आधारवर जारी केलेले कोणतेही अनधिकृत सिम बंद करण्याची विनंती वेबसाइटवर नोंदवू शकता. दूरसंचार विभागाने यासंदर्भात टेलिकॉम अॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन (TAFCOP) वेबसाइट जारी केली होती.
ही सेवा अद्याप देशभरात उपलब्ध नाही. वेबसाइटनुसार, हे सध्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या युझर्ससाठी उपलब्ध आहे. मात्र, लवकरच ही सेवा देशभरातील इतर युजर्ससाठी उपलब्ध करुन दिली जाईल, असा विश्वास आहे. तुम्ही देखील आंध्र प्रदेश किंवा तेलंगणाचे ग्राहक असाल तर तुम्ही तुमच्या आधारवर जारी केलेले क्रमांक सहज तपासू शकता.
त्यासाठी तुम्हाला प्रथम तुमच्या ब्राउझरमध्ये tafcop.dgtelecom.gov.in ही वेबसाइट उघडावी लागेल. यानंतर, आधारशी लिंक असलेला तुमचा मोबाइल नंबर प्रविष्ट करा आणि ओटीपीची विनंती करा. त्यानंतर तुम्हाला 6 अंकी OTP पाठवला जाईल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला पुढील पेजवर नेले जाईल. तिथे तुम्ही तुमच्या आधारसोबत नोंदणीकृत सर्व मोबाईल नंबरची माहिती मिळवू शकता. तुम्हाला कोणताही मोबाईल अनधिकृत वाटत असेल तर तुम्ही त्या नंबरवर क्लिक करून तक्रार करू शकता.