नवी दिल्ली - ऑनलाईन व्यवहार करण्याकडे हल्ली सर्वांचाच अधिक कल असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीत वाढ झाली आहे. QR कोडच्या मदतीने युजर्सना जाळ्यात अडकवलं जात आहे. एखाद्या दुकानात किंवा पेट्रोल पंपावर QR कोड स्कॅन करून पेमेंट करीत असाल तर वेळीच सावध होण्याची सध्या गरज आहे. दुकानदारला ऑनलाईन पैसे पाठवताना क्यूआर कोडचा वापर हमखास केला जातो. मात्र यामुळे फसवणूक होत असल्याची माहिती समोर आली आहे. Quick Response (QR) हे सर्वात आधी जपानमध्ये बनवण्यात आलं होतं. आता भारतात याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. क्यूआर कोड फिशिंग म्हणजे नेमकं काय आहे आणि यापासून कसा धोका आहे याबाबत जाणून घेऊया.
ज्या प्रकारे तुम्ही डिजिटल देवाण घेवाण करत असतानाच फ्रॉडचे प्रमाण हे सर्वाधिक असते. कॉन्टॅक्टलेस पेमेंट करताना अनेक जण स्कॅन करून पेमेंट ट्रान्सफर करीत असतात. फ्रॉडस्टर त्यावेळी याचा गैरफायदा घेत असतात. क्यूआर कोडला बदल करतात. ज्यामुळे पेमेंट फ्रॉडस्टरच्या अकाऊंटला जातं. यावेळी क्यूआर कोड बदलून तसेच क्यूआर कोड टाकल्यानंतर क्यूआर कोड फिशिंग केलं जातं. त्यामुळे पैसे दुकानदाराच्या खात्यात न जाता थेट फ्रॉडस्टरच्या अकाउंटमध्ये जातं.
यूपीआय पिन देताच स्कॅमरच्या अकाऊंटमध्ये जातात पैसे
क्यूआर कोड फिशिंगची वेगवेगळी पद्धत आहे. यासाठी स्कॅमर तुम्हाला मेसेज किंवा ईमेल द्वारे क्यूआर कोड सेंड करत असतात. ज्यामध्ये युजर्सना 10 हजार रुपयांची लॉटरी लागली असल्याची खोटी माहिती सांगितली जाते. तसेच तुमचा यूपीआय पिन देऊन पैसे आपल्या बँक अकाऊंटमध्ये घेतले जातात. ज्यावेळी तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करीत असतात त्यावेळी यूपीआय पिन मागितला जातो. तुम्हाला वाटेल की, पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येतील. मात्र, यूपीआय पिन देताच तुमचे पैसे स्कॅमरच्या अकाऊंटमध्ये जातात.
क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करताना सावध
पेट्रोल पंप किंवा दुकानदारकडे तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करून पैसे देत असतात त्यावेळी क्यूआर कोड बदलण्याची शक्यता असते. क्यूआर कोड स्कॅन करताना पेमेंट स्कॅमर अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करत असतात. त्यामुळेच क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करताना सावध राहा. अशा पद्धतीने पेमेंट करण्यापेक्षा एखाद्या अॅपची निवड करा ज्यामध्ये सर्व गोष्टींचा तपशील हा देण्यात आलेला असेल. तसेच आपली फसवणूक झालीय हे लक्षात येताच सायबर सेलकडे याबाबत तक्रार करा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.