गुगलने आधी अपयशी ठरलेल्या गुगल ग्लास या अत्याधुनिक आवृत्ती सादर केली असून या प्रॉडक्टला आता कार्पोरेट क्षेत्रासाठी खास करून विकसित करण्यात आले आहे.
गुगल ग्लास सर्वप्रथम या कंपनीच्या एक्स या शाखेतर्फे (hyperlink: http://www.x.company)(तेव्हाचे नाव गुगल एक्स) विकसित करण्यात आला होता. २०१२ साली डेव्हलपर्ससाठी सर्वप्रथम हे प्रॉडक्ट उपलब्ध करण्यात आले होते. प्रारंभीच्या काळात गुगल ग्लास क्रांतीकारी ठरणार असल्याची भाकिते करण्यात आली होती. अनेक तज्ज्ञांनी तर या प्रॉडक्टमुळे स्मार्टफोनची सद्दी संपणार असल्याचे ठासून सांगितले होते. मात्र हा आशवाद फोल ठरल्याचे पुढे सिध्द झाले. २०१३ साली हे प्रॉडक्ट व्यावसायीक पातळीवर सर्वसामान्यांना सादर करण्यात आले होते. याची संकल्पना अतिशय नाविन्यपुर्ण असली तरी एक तर हे प्रॉडक्ट खूप महागडे होते. तसेच प्रत्यक्ष वापरात ते सुरक्षेसाठी घातक असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभुमिवर जानेवारी २०१५ मध्ये गुगल ग्लासची विक्री थांबविण्यात आली होती. गुगलच्या सर्वात अपयशी ठरलेल्या प्रोजेक्टमध्ये याचा समावेश होत होता. तथापि, गुगल ग्लास आता नवीन स्वरूपात सादर करण्यात आले आहे. याची नवीन आवृत्ती गुगल ग्लास एंटरप्राईज एडिशन या नावाने लाँच करण्यात आली आहे. नावातच नमूद असल्यानुसार याला उद्योगात वापरण्यात येऊ शकते.
गुगल ग्लासच्या नवीन आवृत्ती ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला असून चांगल्या दर्जाची बॅटरी आणि प्रोसेसर असेल. यात व्हिडीओ रेकॉर्डींगसाठी इंडिकेटर असून सुधारित वाय-फाय कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यात आली आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे गुगल ग्लास आता सहजपणे दुसरा चष्मा वा गॉगलवर लाऊन वापरणे शक्य आहे. यात इंडस्ट्रीयल वापरासाठी असणार्या ग्लासेसचाही समावेश आहे. म्हणजेच आता गुगल ग्लास खर्या अर्थाने मॉड्युलर झाले असून याचा विविधांगी वापर शक्य आहे. औद्योगिक क्षेत्रात अनेक क्लिष्ट कामांमध्ये गुगल ग्लास वापरता येईल. यासोबत कृषी, हवाई क्षेत्र, आरोग्य, वाहतूक आदींसह अन्य क्षेत्रांचा समावेश आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे गुगल ग्लास आता कस्टमाईज्ड करण्याची सुविधा देण्यात आली असून यासाठी काही पार्टनरची यादीदेखील (hyperlink: http://www.x.company/glass/partners) जाहीर करण्यात आली आहे. म्हणजेच हे प्रॉडक्ट व्यावसायिक पातळीवर मोजक्या ग्राहकांना वापरता येणार असल्याचे अधोरेखित झाले आहे.