नवी दिल्ली : फसव्या आणि स्पॅम कॉल्सच्या त्रासापासून लोकांची सुटका होऊ शकते. हॉट्सॲप आणि कॉलर आयडी सेवा देणारी कंपनी ट्रु कॉलर यांनी भागीदारी केली आहे. लवकरच हॉट्सॲप एक फिचर जोडणार असून वापरकर्त्यांची फेक, स्पॅम आणि इंटरनेटच्या माध्यमातून येणारे कॉल्स ओळखण्यास मदत होणार आहे.
नवे फिचर ऑडिओ आणि व्हिडीओ या दोन्ही प्रकारच्या कॉल्ससाठी उपलब्ध राहणार आहे. ट्रु कॉलरतर्फे कॉल करणाऱ्याची ओळख पटविण्यात येते. मात्र, नव्या फिचरमुळे ही व्याप्ती वाढणार आहे.
हॉट्सॲपवर फेक कॉल्स वाढले
गेल्या दोन आठवड्यांमध्ये हॉट्सॲपवर फेक कॉल्सचे प्रमाण वाढले आहे. त्यातील बहुतांश काॅल्स हे आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून येत असल्याची तक्रार अनेक वापरकर्त्यांनी केली आहे.
कॉल ब्लॉक करण्यासाठी ‘एआय’ची मदत
जगभरात स्पॅम आणि टेलिमार्केटिंग कॉल्सचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ते कमी करण्यासाठी दूरसंचार नियामकने ‘एआय’चा वापर करण्याचे निर्देश सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सला दिले आहेत. अशा प्रकारची सेवा देण्यासाठी ट्रु काॅलरची या कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे.