जी-मेलची सेवा गेल्या तासाभरापासून बंद आहे. त्यामुळे अनेकांना ई-मेल पाठवण्यात अडचणी येत आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी याबद्दलच्या तक्रारी मांडल्या आहेत. जी-मेलच्या माध्यमातून ई-मेल पाठवण्यात आणि फाईल अटॅच करण्यात समस्या येत आहेत. केवळ भारतातच नव्हे, तर ऑस्ट्रेलिया, जपान आणि जगातील इतर भागांमध्येही जी-मेलची सेवा विस्कळीत झाली आहे.
गेल्या तासाभरापासून जी-मेलची सेवा ठप्प आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पडतो आहे. जी-मेलसोबतच गुगल ड्राईव्हमध्येही तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना फाईल शेअर करताना अडचणी येत आहेत. याशिवाय फाईल अपलोड आणि डाऊनलोड करणंही कठीण जात आहे. गुगलची इंजिनियरिंग सध्या यावर काम करत आहे. मात्र ही समस्या नेमकी कधीपर्यंत दूर होईल, याची माहिती गुगलकडून देण्यात आलेली नाही.
गेल्या दोन महिन्यांत दुसऱ्यांदा जी-मेलच्या सेवेवर परिणाम झाला आहे. याआधी जुलैमध्येही जी-मेलची सेवा तांत्रिक कारणांमुळे विस्कळीत झाली होती. त्यावेळी जी-मेल वापरकर्त्यांना लॉग इन करता येत नव्हतं. जी-मेलने याची दखल घेत ही समस्या सोडवली होती. मात्र ती नेमकी कोणत्या कारणामुळे निर्माण झाली, याची माहिती दिली नव्हती.