नवी दिल्ली : देशाची सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL लवकरच देशभरात 4G सेवा सुरु करणार असून सध्याच्या ग्राहकांना 4G सिम देण्यात येणार आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये कंपनीने 2100MHz स्पेक्ट्रम घेतले आहेत. सध्या प्राथमिक स्तरावर केरळच्या इदुकी जिल्ह्यात 4G सेवा दिली जात असून चेन्नईमध्येही 4G सिम देण्य़ास सुरुवात करण्यात आली आहे.
महत्वाचे म्हणजे, बीएसएनएलनेच 8-9 वर्षांपूर्वीच थ्रीजी सेवा देशात पहिल्यांदा देण्यात सुरुवात केली होती. मात्र, 4 जी सेवा देण्यास बीएसएनएल मागे पडली आहे. जिओने 4 जी सेवा सुरु करून दोन वर्षे झाली तरीही बीएसएनएल अद्याप ही सेवा सुरु करू शकली नव्हती.
चेन्नई सर्कलसाठी 4जी सिमसोबत 2 जीबीचा डेटा दिला जात आहे. हे सिम घेण्यासाठी 20 रुपये आकारले जात आहेत. तर गुजरातच्या गांधीधाम आणि अंजर भागात 26 नोव्हेंबरपासून ही सेवा सुरु करण्यात आली आहे. यानंतर ग्राहकांच्या मोबाईलवर 3जी सेवा मिळणार नाही. मात्र, 2जी सेवा सुरु राहणार आहे. येत्या सहामाहिमध्ये कंपनी देशभरात 4 जी सेवा सुरु करणार आहे.