गेल्या काही वर्षांमध्ये गेमिंग इंडस्ट्री आणि तंत्रज्ञान खूप बदलले आहे. काही वर्षांपूर्वी सुपर मारिओ (Super Mario) आणि कॉन्ट्रासारखे (Contra) गेम्स एकाच कार्ट्रेजमध्ये येत होते. परंतु आता त्यांची जागा हाय क्वालिटी आणि मोठ्या ग्राफिक्स असलेल्या गेम्सनं घेतली आहे. हे परिवर्तन कम्प्युटर गेम्सपासून गेमिंग कन्सोलसारख्या प्लेस्टेशन एक्सबॉक्स पर्यंत आलं आहे. सध्या याची जागा आता स्मार्टफोन्सनं घेतली आहे. आज गेमिंग हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही, तर याकडे एक उत्तम करिअर म्हणूनही पाहिलं जात आहे.
सध्याच्या काळात अनेक गेमर्स ऑनलाइन स्ट्रीमिंग करतात. यासाठी उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि हाय स्पीड इंटरनेटची आवश्यकता असते. आज भारत हा संपूर्ण जगात सर्वात मोठा गेमिंग हब आहे. याशिवाय देशात गेमिंग इन्फ्रास्ट्रक्चर तेजीनं वाढत आहे. अशातच आगामी काळात येणारं 5G तंत्रज्ञान यामध्ये मोठं परिवर्तन करेल असंही म्हटलं जात आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी एअरटेलनं हे शक्य करून दाखवलं आहे. एअरटेलनं नुकतंच मानेसरमध्ये 5G लाईव्ह टेस्ट नेटवर्कवर क्लाऊ़ड गेमिंग डेमो सेशनचं आयोजन केलं होतं. याच्या निकालानं भविष्यातील अनेक मार्ग खुले केले आहेत.कसा होता परफॉर्मन्स?क्लाऊड गेमिंगचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी एअटेलनं देशातील टॉप गेमर सलमान अहमद ज्याला माम्बा आणि नमन माथूर ज्याला मॉर्टल या नावानं ओळखलं जातं त्याला बोलावण्यात आलं होतं. त्यांच्या स्मार्टफोन्सना 3500 मेगाहर्ट्स कॅपेसिटीच्या स्पेक्ट्रम बँडशी कनेक्ट करण्यात आलं. त्यांना एअरटेल 5G वर 1 GBPS पेक्षा अधिक स्पीड आणि 10 मिलीसेकंदाची लेटेन्सी मिळाली. दोघांनीही हा स्मार्टफोन गेमिंग एक्सपिरिअन्स हाय एन्ड पीसी आणि कन्सोल गेमिंगसारखा असल्याचं म्हटलं. कोणत्याही लॅगिंग शिवाय गेमिंग, लेटेन्सी आणि पिंगच्या 5G प्रत्येक गेमरचं स्वप्न बनेल आणि संपूर्ण भारतात ते लाँच होण्याची वाट पाहत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. क्लाऊड गेमिंगद्वारे कोणत्याही अतिरिक्त हार्डवेअर शिवाय अथवा गेम डाऊनलोड करता डिजिटल बॅटलग्राउंडचा आनंद घेता येतो.