गुगल कंपनीने आपल्या अॅलो या मॅसेंजरची वेब आवृत्ती सादर केली असून पहिल्या टप्प्यात अँड्रॉइड स्मार्टफोनवरून क्युआर कोड स्कॅन करूनच याचा वापर करता येणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून गुगल अॅलो या मॅसेंजरची डेस्कटॉप आवृत्ती येणार असल्याची चर्चा सुरू होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. आता कुणीही आपल्या संगणकावरील क्रोम या वेब ब्राऊजरमध्ये अॅलो मॅसेंजर वापरू शकेल. अर्थात यात एक ट्विस्ट आहे. म्हणजेच अँड्रॉईडचे स्मार्टफोन युजरच याचा वापर करू शकतील. अर्थात डेस्कटॉप आवृत्तीसाठी अँड्रॉइड स्मार्टफोन हा निकष बर्याच जणांच्या लक्षात येणार नाही. तथापि, गुगल अॅलो वापरण्यासाठी क्युआर कोड स्कॅन करावा लागणार असून सध्या फक्त अँड्रॉइड स्मार्टफोनवरूनच ही सुविधा प्रदान करण्यात आली आहे. तर आयओएस प्रणालीसाठी ही सुविधा लवकरच मिळणार असल्याचे गुगल कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
डेस्कटॉपवर गुगल अॅलो वापरण्यासाठी https://allo.google.com/web या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. यानंतर आपल्या स्मार्टफोनमधील गुगल अॅलो अॅपवर जाऊन मेन्यूमध्ये जात 'अॅलो फॉर वेब' या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर संबंधीत संकेतस्थळावरील क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर कुणीही संगणकावरून गुगल अॅलो वापरू शकतो.
अॅलो हा गुगल कंपनीचा स्मार्ट मॅसेंजर आहे. यात वैयक्तीक आणि ग्रुप चॅटींगसह अनेक उत्तमोत्तम फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. यात टेक्स्ट फॉर्मेट, इमोजी, स्टीकर्स आदींचा समावेश आहे. यात जी-मेलप्रमाणे स्मार्ट रिप्लायचाही पर्याय असेल. सर्वात महत्वाचे म्हणजे यात कृत्रीम बुध्दीमत्तेवर आधारित गुगल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे. व्हाईस कमांड अर्थात ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने याचा कुणीही विविध फंक्शन्ससाठी वापर करू शकतो.