गुगलच्या अँड्रॉइड या ऑपरेटींग सिस्टीमध्ये सुरक्षेच्या अतिशय गंभीर चुका आढळून आल्या असून यामुळे यावर चालणार्या लक्षावधी उपकरणांमधील सुरक्षेला धोका असल्याचे आढळून आले आहे. अमेरिकेतील लास व्हेगास शहरात झालेल्या ब्लॅक हॅट सिक्युरिटी कॉन्फरन्समध्ये अँड्रॉइड प्रणालीतील त्रुटींबाबतचे संशोधन जाहीर करण्यात आले. क्रिप्टोवायर या सायबर सुरक्षा संस्थेने याबाबत सविस्तर अहवाल जाहीर केला आहे. यानुसार अँड्रॉइड प्रणालीमध्ये सुरक्षेची पूरेपूर काळजी घेण्यात आलेली नाही.
अँड्रॉइड ही ऑपरेटींग सिस्टीम ओपनसोर्स म्हणजे मुक्तस्त्रोत या प्रकारातील आहे. याचे अनेक लाभ आहेत. एक तर याचे अपडेट तातडीने येत असतात. ही प्रणाली मोफत उपलब्ध असून यात जगभरातील डेव्हलपर्स आपापल्या परीने भर टाकत असतात. तथापि, याचे तोटेदेखील आहेत. विशेष करून थर्ड पार्टी अॅप्समध्ये सुरक्षाविषयक अनेक त्रुटी असून तेच अॅप्स अनेक युजर्स आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करत असतात. यासाठी युजर्स संबंधीत अॅप्सला सर्व परमीशन्स प्रदान करत असतात. कुणीही सजगपणे आपण नेमक्या कोणत्या घटकांच्या अॅक्सेससाठी परवानगी देतोय याची माहिती जाणून घेत नाही. मात्र ही चूक खूप महागात पडू शकते. क्रिप्टोवायर संस्थेने नेमके याच अनुषंगाने संशोधन केले असून याचे निष्कर्ष अतिशय धक्कादायक असेच आहेत.
अँड्रॉइड प्रणालीतील सुरक्षेविषयक त्रुटींमुळे कुणीही हॅकर हा एखादा स्मार्टफोन दुरवरून नियंत्रित करू शकतो. तो त्या स्मार्टफोनमधील सर्व माहितीचा अॅक्सेस सहजपणे मिळवू शकतो. तो कोणत्याही स्मार्टफोनमधील कॅमेरा, मायक्रोफोन, कॉन्टॅक्ट लिस्ट आदींवरही नियंत्रण मिळवू शकतो. झेडटीई, एलजी, असुस आदी ख्यातप्राप्त संस्थांच्या काही हँडसेटमध्येही अशा प्रकारच्या त्रुटी आढळून आल्याचा दावा क्रिप्टोवायर या संस्थेने केला आहे. याशिवाय अन्य स्वस्त हँडसेटमध्ये अशा प्रकारे त्रुटी असल्याचेही या कंपनीचे म्हणणे आहे. हा पॅच दुरूस्त करण्याचे अवाहनदेखील या कंपनीतर्फे करण्यात आले आहे.