गुगलने अँड्रॉइड प्रणालीच्या 'पी' या आवृत्तीसाठी नावाचा शोध सुरू केला असून याबाबत टेकविश्वात कुतुहलाचे वातावरण निर्मित झाले आहे.
गुगलने आपल्या अँड्रॉइड प्रणालीच्या विविध आवृत्त्यांना मिष्ट पदार्थांचे नाव दिले आहे. नवीन आवृत्तीसाठी जगातल्या एखाद्या देशामध्ये लोकप्रिय असणारे चॉकलेट, आईसक्रीम, डेझर्ट, बिस्कीट अथवा अन्य मिठाईचे नाव दिले जाते. यात कपकेक, डोनट, एक्लेयर, फ्रोयो. जिंजरबर्ड, हनीकोंब, आईसक्रीम सँडवीच, जेलीबीन, किटकॅट, लॉलीपॉप, मार्शमॅलो, नोगट आणि ओरिया यांचा समावेश आहे. सध्या अँड्रॉइडची आठवी आवृत्ती प्रचलीत असून याला ओरियो हे नाव देण्यात आले आहे. या वर्षीच्या मे महिन्यात झालेल्या गुगल आय/ओ परिषदेत अँड्रॉइडची नववी अर्थात 'पी' या आवृत्तीची घोषणा करण्यात आली. याचे सर्व फिचर्स जाहीर करण्यात आली असून याचा प्रिव्ह्यूसुध्दा सादर करण्यात आला आहे. याला युजर्स आता बीटा अर्थात प्रयोगात्मक या प्रकारामध्ये वापरत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये विविध स्मार्टफोनच्या मॉडेल्समध्ये अँड्रॉइड पी प्रणाली वापरण्यासाठी सादर करण्यात येणार आहे. यासोबत आता 'पी' या आवृत्तीला नेमके काय नाव मिळणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. यासाठीचे नाव हे गुगलने सुरू केलेल्या परंपरेनुसार मिष्ट पदार्थाचेच असणार ही बाब स्पष्ट आहे. मात्र यासाठी कोणते नाव निवडण्यात येणार याबाबत उत्सुकता लागली आहे.
ब्लुमबर्ग या वृत्तसंस्थेने 'पी' आवृत्तीचे नाव 'पिस्ताचिओ आईसक्रीम' असेल असा गौप्यस्फोट केला आहे. तर चीनी सोशल मीडियातदेखील याच नावाची चर्चा सुरू आहे. तथापि, यापूर्वीचा पॅटर्न पाहता गुगल धक्कातंत्राचा वापर करण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. अर्थात यासाठी ऐनवेळेस दुसरे नाव समोर येण्याची शक्यतादेखील आहे. दरम्यान, ताज्या वृत्तानुसार लवकरच अँड्रॉइडच्या पी आवृत्तीचा फायनल प्रिव्ह्यू सादर करण्यात येणार आहे. यानंतर गुगलच्या पिक्सेल मालिकेतील स्मार्टफोनमध्ये या आवृत्तीचे अपडेट सर्वात पहिल्यांदा मिळणार आहे. यानंतर अन्य फ्लॅगशीप म्हणजेच उच्च श्रेणीतील मॉडेल्समध्ये याचा वापर करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.