जगाला कोरोनाच्या खाईत ढकलणाऱ्या चीनला एकामागोमाग एक असे झटके बसत आहेत. कोरोनाच्या प्रतिबंधांमुळे चीनमध्ये स्मार्टफोनच्या उत्पादनाला खीळ बसू लागली आहे. यामुळे अॅपलसारख्या कंपन्यांनी आपले प्रकल्प चीनमधून भारतात हलविण्याची तयारी सुरु केली आहे. सध्या महाराष्ट्र-गुजरातमध्ये फॉक्सकॉनवरून वाद सुरु आहे, असे असतानाच गुगलबाबत महत्वाची माहिती हाती येत आहे.
गुगल आपला मॅन्युफॅक्चरिंग असेंब्ली युनिट चीनमधून भारतात हलवण्याच्या तयारीत आहे. अॅपलनेही नुकतीच तशी घोषणा केली आहे. यामुळे अॅपलचे फोन आणि अन्य उत्पादने बनविणाऱ्या कंपन्या भारतात दाखल होऊ लागल्या आहेत. फॉक्सक़ॉनदेखील त्यापैकीच एक आहे. चीनमध्ये कोविड-19 मुळे निर्बंधांचा काळ अजूनही सुरू आहे. अशा परिस्थितीत बहुतांश टेक कंपन्या चीनऐवजी भारत आणि इतर देशांकडे वळत आहेत.
टेक कंपनी गुगल भारतात पिक्सल स्मार्टफोन बनवणार आहे. यासाठी कंपनीने भारतीय उत्पादकांकडून दहा लाख पिक्सल स्मार्टफोन तयार करण्यासाठी बोली सादर करण्याची घोषणा केली आहे. कंपनी तिच्या एकूण Pixel स्मार्टफोन उत्पादनांपैकी 10 ते 20 टक्के उत्पादन भारतात करण्याची शक्यता आहे. याआधी पिक्सेल स्मार्टफोन्सचे सर्वाधिक उत्पादन चीनमध्ये घेण्यात आले होते.
देशातील स्मार्टफोनच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी PLI (उत्पादन लिंक्ड इनिशिएटिव्ह) योजना भारत सरकारने सुरू केली आहे. त्याचा फायदा होताना दिसत आहे. या योजनेद्वारे भारत मोबाईल उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार आहे. अॅपल नुकताच लाँच केलेला आयफोन १४ सोडून इतर सर्व आयफोन भारतात असेंबल करते.