मुंबई - वनप्लस कंपनीने बुलेट या नावाने नवीन वायरलेस इयरफोन्स भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्याची घोषणा केली असून यात गुगल असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत देण्यात आला आहे. वनप्लस कंपनीने नुकत्याच आयोजीत केलेल्या कार्यक्रमात वनप्लस ६ या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनचे अनावरण केले. याच कार्यक्रमात बुलेट वायरलेस इयरफोन्सही सादर करण्यात आले. हे मॉडेल लागलीच भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आले आहे. याचे मूल्य ३,९९९ रूपये आहे. हे मॉडेल अतिशय स्टायलीश असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यामध्ये गुगल असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत देण्यात आला आहे. अर्थात कुणीही ध्वनी आज्ञावली म्हणजेच व्हाईस कमांडचा वापर करून म्युझिकचा ट्रॅक पुढे-मागे करणे अथवा आवाज कमी-जास्त करणे आदी फंक्शन्स पार पाडू शकतो. तसेच याच्याशी संलग्न असणार्या स्मार्टफोनवर कॉल करण्याची सुविधादेखील यात आहे. यासाठी यामध्ये अतिशय दर्जेदार मायक्रोफोन इनबिल्ट अवस्थेत देण्यात आला आहे.
वनप्लस बुलेट या वायरलेस इयरफोन्समध्ये दिलेली बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १० तासांचा बॅकअप देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामधील बॅटरीत वनप्लस कंपनीची डॅश चार्ज ही चलद चार्जींग प्रणालीदेखील देण्यात आली आहे. यामुळे फक्त १० मिनिटे चार्ज केल्यावर हा इयरफोन पाच तासांपर्यंत चालू शकत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यासाठी युएसबी टाईप-सी या प्रकारातील अॅडाप्टर देण्यात आले आहे. हे इयरफोन्स ब्ल्यु-टुथच्या मदतीने स्मार्टफोन वा अन्य उपकरणाशी कनेक्ट करता येतात. याची रेंज १० मीटर इतकी आहे. यातील इयरबडस्च्या मागील बाजूस मॅग्नेट लावलेले आहे. यामुळे वापर होत नसतांना ते एकमेकांना चिपकून राहतात