बोस कंपनीने जगात पहिल्यांदाच गुगल असिस्टंटची सुविधा असणारा ‘क्युसी ३५ २’ हा वायरलेस हेडफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.गुगल असिस्टंटच्या मदतीने कुणीही ध्वनी आज्ञावलीवर आधारित विविध फंक्शन्सचा वापर करू शकतो. आजवर स्मार्टफोन तसेच स्मार्ट स्पीकरमध्ये हा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे. आता बोस कंपनीने आपल्या वायलेस हेडफोनमध्ये गुगल असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत दिला आहे. ही सुविधा असणारे बोस ‘क्युसी ३५ २’ हे मॉडेल नुकतेच बाजारपेठेत सादर करण्यात आले आहे.
याच्या उजव्या बाजूच्या इयरफोनमध्ये एक स्वतंत्र बटन दिलेले असेल. हे ऑन केल्यानंतर गुगल असिस्टंट कार्यान्वित करता येतो. यानंतर कुणीही ध्वनी आज्ञावलीच्या माध्यमातून आपल्याला हव्या त्या व्यक्तीला कॉल करण्यासह कॅलेंडरवरील आजचे नियोजन, हवामानाचे अलर्ट, बातम्या आदी ऐकू शकतो. यात नॉइस कॅन्सलेशन हे महत्वाचे फिचरदेखील आहे. हा वायरलेस हेडफोन उत्तम दर्जाच्या बॅटरीने सज्ज असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल २० तासांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. बोस क्युसी ३५ २ हे मॉडेल जागतिक बाजारपेठेत ३४९.९५ डॉलर्स मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे.
गुगल कंपनीने जाणीवपूर्वक आपल्या गुगल असिस्टंटची व्याप्ती वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वीच थर्ड पार्टीजसाठी याचा ‘एपीआय’ खुला करण्यात आला होता. यानंतर सोनी आणि अन्य कंपन्यांनी आपल्या याचा वापर करून विकसित केलेले स्मार्ट स्पीकर बाजारपेठेत सादर केले आहेत. यातच बोस कंपनीने वायरलेस हेडफोनमध्येही याचा वापर केल्यामुळे गुगल असिस्टंटच्या वापराला एक नवीन उपकरण मिळाले आहे. अर्थात आगामी कालखंडात अन्य वायरलेस हेडफोनमध्येही गुगल असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत मिळू शकतो. आणि व्यापक दृष्टीकोनातून याचा विचार केल्यास व्हाईस कमांडवर आधारित उपकरणांची संख्यादेखील वाढू शकते.