मुंबई : कॉम्प्युटरवर मायक्रोसॉफ्टचे वर्चस्व असताना गुगलने 2008 साली लाँच केलेल्या गुगल क्रोम ब्राऊजरला मोठे यश मिळाले. क्रोमला 2 सप्टेंबरला 10 वर्षे पूर्ण झाली. या काळात मायक्रोसॉफ्टच्या इंटरनेट एक्सप्लोररसह मॉझिला फायरफॉक्स, नेटस्केप, सफारी ब्राऊजरना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
जेव्हा क्रोम ब्राऊजरला गुगलने लाँच केले तेव्हा बाजारात केवळ तीनच ब्राऊजर प्रसिद्ध होते. इंटरनेट एक्सप्लोरर, मॉझिला फायरफॉक्स आणि अॅपलचा सफारी. परंतू क्रोम आल्यानंतर या तिनही ब्राऊजरचा वापर कमी झाला. नेट मार्केटच्या अनुसार गुगल क्रोमचा वापर 60 टक्के लोकांकडून केला जातो. हा ब्राऊजर मोफत असला तरीही गुगल वापरकर्त्यांची माहिती उत्पन्नासाठी वापरत असल्याचा आरोप झाला होता. मात्र, गुगलने ही माहिती सेवा सुधारण्यासाठी करत असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.
गुगलचा वापर का वाढला ?क्रोम ब्राऊजरचा वापर वाढण्यामागे युजर इंटरफेस सुटसुटीत असणे हे मुख्य कारण आहे. याचबरोबर या ब्राऊजरचा वेग वापरकर्त्याना भावला. 10 वर्षांपूर्वीचा क्रोम फायरफॉक्स आणि सफारीपेक्षा 10 पटींनी वेगवान होता. तर इंटरनेट एक्सप्लोरर पेक्षा 56 पटींनी वेगवान होता. तसेच या ब्राऊजरमध्ये देण्यात येणारे पर्यायही सर्वात जास्त देण्यात आले होते. Incognito Mode हा देखील क्रोममध्येच पहिल्यांदा देण्यात आला होता. तसेच जाहीराती बंद करण्यासाठीही यामध्ये पर्याय होता. तसेच क्रोमच्या वापरामुळे गुगलच्या जीमेलसारख्या सुविधाही यात मिळू लागल्याने क्रोमचा वापर वाढला.