गुगलच्या क्रोम ब्राऊजरला मटेरियल डिझाईन प्रदान करण्यात आले असून यात नवीन फिचर्सचा समावेश करण्यात येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
गुगलचे क्रोम हे ब्राऊजर जगभरात अतिशय लोकप्रिय आहे. संगणकासह स्मार्टफोनवरही याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली असून ते जगातील युजर्सच्या संख्येनुसार पहिल्या क्रमांकाचे ब्राऊजर आहे. याची उपयुक्तता वाढविण्यासाठी गुगलने वेळोवेळी प्रयत्न केले आहे. विशेष करून याच्या विविध आवृत्त्यांमध्ये सातत्याने नवनवीन फिचर्स देण्यात येतात. या अनुषंगाने यात अलीकडेच त्रासदायक जाहिरातींना ब्लॉक करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच यामध्ये ऑफलाईन वापराचे फिचरदेखील देण्यात आले आहे. अर्थात विविध फिचर्सच्या माध्यमातून याची उपयुक्तता वाढत असली तरी या ब्राऊजरचा युजर इंटरफेस हा गेल्या अनेक वर्षांपासून एकाच प्रकारचा आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेत आता क्रोम ब्राऊजरचा कायापालट करण्याचे संकेत गुगलने दिले आहेत. या अनुषंगाने काही डेव्हलपर्सला याचा नवीन लूक असणार्या क्रोमला सादर करण्यात आले असून याची चाचणी घेतली जात आहे.
नवीन क्रोम ब्राऊजरला मटेरियल डिझाईनचा साज चढविण्यात आला आहे. अर्थात याचा लूक हा अतिशय आकर्षक असाच असणार आहे. यातील टॅबचा आकारदेखील बदलवण्यात येणार आहे. यात पिन्ड टॅब, अलर्ट इंडिकेटर आदी फिचर्सदेखील देण्यात येणार आहेत. गुगलने हे सर्व फिचर्स काही डेव्हलपर्सला प्रयोगात्मक अवस्थेत दिले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये सर्व युजर्ससाठी याला सादर करण्यात येईल ही शक्यता आहे.