नवी दिल्ली - महान व्यक्तींच्या जन्मदिनी अथवा पुण्यतिथी दिनी गुगल विशेष डुडल बनवून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. कित्येकदा विशेष उत्सव-सणांच्या पार्श्वभूमीवरदेखील विशेष डुडल बनवण्यात येते. मात्र, 3 मे म्हणजे आजच्या दिवशी साकारण्यात आलेले गुगल डुडल जरा वेगळ्या विषयावर साकारण्यात आलेले आहे. 'The Conquest of the Pole' या फ्रेंच भाषेतील मूकपटाच्या प्रीमिअरला 106 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं गुगल डुडल साकारण्यात आले आहे. विशेष म्हणजे साकारण्यात आलेले डुडल हे गुगलचे पहिलं Virtual Reality (VR) आहे, त्याचा व्हिडीओ यु-ट्यूबवर अपलोडदेखील करण्यात आला आहे.
फ्रेंच सिनेदिग्दर्शक Georges Méliès यांच्या आठवणींना उजाळा देत गुगल डुडल साकारण्यात आले आहे. 'The Conquest of the Pole' या त्यांच्या सिनेमाला 3 मे 2018ला 106 वर्ष पूर्ण झाले आहेत. Georges Méliès यांना सिनेमामध्ये Virtual Reality इफ्केटचे तंत्र वापरण्यास सुरुवात करण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञानांचा प्रयोग करण्यासाठी ओळखले जाते. याच कारणामुळे गुगलनं पहिल्यांदा VR डुडल साकारले आहे.
8 डिसेंबर 1861 साली पॅरिसमध्ये जन्म झालेले Georges Méliès यांनी 1896 साली सिनेजगतात प्रवेश केला. 1912 साली त्यांचा शेवटचा सिनेमा झळकला. या कालावधीदरम्यान त्यांनी एकूण 520 सिनेमांची निर्मिती केली होती. सिनेजगतात देण्यात आलेल्या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. 21 जानेवारी 1932 साली त्यांनी जगाचा निरोप घेतला.