जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन गुगलची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. गुगलचा एक कर्मचारी नोकरी सोडून दुसऱ्या कंपनीत जात होता, पण कंपनीला त्याला सोडायचं नव्हतं. कर्मचाऱ्याला थांबवायचं म्हणून गुगलने त्याच्या पगारात 10-20 टक्क्यांनी नाही तर थेट 300 टक्क्यांनी वाढ केली. ज्या कंपनीत कर्मचारी गुगल सोडून जॉइन होण्याच्या विचारात होता, त्या कंपनीच्या सीईओने हा खुलासा केला आहे.
बिझनेस टुडेवर प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, गुगलचा हा आवडता कर्मचारी आयआयटी मद्रासच्या माजी विद्यार्थ्याने सुरू केलेला स्टार्टअप Perplexity AI ज्वॉईन करणार होता. पण जेव्हा कंपनीने त्याचा पगार एवढा वाढवला तेव्हा तो गुगलमध्येच राहिला. Perplexity AI चे CEO अरविंद श्रीनिवास यांनी बिग टेक्नॉलॉजी पॉडकास्टमध्ये याचा खुलासा केला आहे.
या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, सध्या गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्यासाठी कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकतं. जो कर्मचारी आमच्या कंपनीत ज्वॉईन होणार होता तो Google Search टीमचा भाग होता आणि त्याचा आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) शी काहीही संबंध नव्हता. असं असूनही, कंपनीने त्याला सोडण्यापासून रोखण्यासाठी त्याच्या पगारात लक्षणीय वाढ करणं आवश्यक मानलं. 300 टक्के पगारवाढ आश्चर्यकारक असल्याचं ते म्हणाले.
गुगलचा या कारनाम्याची चर्चा रंगली आहे. या वर्षी, 2024 च्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यातच कंपनीने अनेक विभागासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेतला. या क्रमाने, Google च्या हार्डवेअर, सेंट्रल इंजिनिअरिंग आणि Google असिस्टंटवर काम करणाऱ्या टीममधून सुमारे 1000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. केवळ गुगलच नाही तर इतर अनेक टेक कंपन्यांमध्येही मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.