नवी दिल्ली : भारतात 'गुगल पे' युजर्ससाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. इंस्टंट मनी ट्रान्सफरवर शुल्क लागू करण्याची घोषणा केवळ अमेरिकन बाजारासाठी असून त्याचा भारतातील अॅप्सवर कोणताही परिणाम होणार नाही, असे गुगल इंडियाने बुधवारी स्पष्ट केले.
भारतात 'गुगल पे'वर ट्रांजक्शन करताना कोणत्याही प्रकारे शुल्क आकारले जाणार नाही, हे आता गुगल इंडियाने केलेल्या या घोषणेनंतर स्पष्ट झाले आहे. भारतात 'गुगल पे' शुल्काबाबत सध्या सुरू असलेल्या बातम्यांचे खंडन करत गुगलने म्हटले आहे की, हे शुल्क फक्त अमेरिकेसाठी आहे. भारतातील 'गुगल पे' किंवा गुगल पे फॉर बिझिनेस अॅपवर शुल्क लागू होणार नाही.
दरम्यान, गुगल जानेवारी 2021 पासून आपल्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म गुगल पेवरून पीअर-टू-पीअर पेमेंट सर्व्हिस बंद करणार आहे. या सर्व्हिसच्या बदल्यात कंपनी इंस्टंट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टम जोडणार. परंतु यासाठी युजर्संना शुल्क भरावे लागेल, अशा काही बातम्या गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या.
फक्त अमेरिकेत लागणार शुल्क आता गुगल इंडियाने हे शुल्क केवळ अमेरिकेतच आकारले जाईल, असे स्पष्ट केले आहे. गुगलने एका सपोर्ट पेजवर स्पष्टीकरण दिले की, ऑरिजिनल गुगल पे अॅप जानेवारीत अमेरिकेत काम करणे थांबवेल. म्हणजेच त्याचा भारतात परिणाम होणार नाही आणि भारतात गुगल पे वापरणाऱ्या ग्राहकांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
2021मध्ये पैसे पाठविण्यासाठी किंवा त्यातून पैसे स्वीकारण्यासाठी pay.google.com चा उपयोग करू शकणार नाही. यासाठी पैसे पाठविण्यासाठी किंवा स्वीकारण्यासाठी नवीन गुगल पे अॅपचा वापर करावा लागेल, असे कंपनीने आपल्या अमेरिकेतील युजर्संना सांगितले आहे. तसेच, गुगल पे अमेरिकेतील युजर्ससाठी इंस्टंट मनी ट्रान्सफरवर शुल्क सुद्धा आकारणार आहे.
गुगलचे असे म्हणणे आहे की, अमेरिकेत डेबिट कार्डमधून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी 1.5% किंवा 0.31 डॉलर (यापेक्षा जास्त असेल) शुल्क लागत आहे. आता गुगल सुद्धा इन्स्टंट मनी ट्रान्सफरवर शुल्क घेण्याची तयारी करत आहे.